लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-बिझनेस एक्स्पो मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थाचा आस्वाद आणि गेम खेळण्याचा मोह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आवरता आला नाही.विद्यार्थ्या मधील उद्योमशीलतेचे कौतुक करून बिल्डीग प्रवराचा उपक्रम आत्मविश्वास निर्माण करणारा असल्याचे सांगितले.
लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सहकारातून समृध्दी शिक्षणातून विकास या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या बिझिनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.आज महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्स्पोला भेट देवून विद्यार्थ्यानी उभारलेल्या प्रत्येक स्टाॅलला भेट दिली.संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांच्यासह मुख्याध्यापक प्राचार्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने एक्स्पो मध्ये सहभागी झाले आहेत.एक्स्पोच्या दुसर्या दिवशीही सर्व स्टाॅलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती.कोल्ड काॅफी पासून ते पाणी पुरीपर्यत आणि गाॅगल पासून ते दुचाकी वाहनाचे स्टाॅल विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने उभारले आहेत.
प्रत्येक स्टाॅलला मंत्री विखे यांनी भेट देवून विद्यार्थ्याशी व्यवसाया बाबत संवाद साधला.तरुणाईची क्रेझ असलेल्या गाॅगलच्या स्टाॅलवर मंत्री विखे पाटील यांनी विद्यार्थ्याच्या आग्रहा खातर गाॅगल घालून तसेच दुचाकीवर बसून फोटोची पोझ देण्याचा आणि सेल्फी काढण्याचा मनमुराद आनंद त्यांनी घेतला. व्यवसायाचा स्टाॅल टाकण्याचे कसे सुचले,भांडवल कसे उभारले आशा प्रश्नातून मंत्री विखे यांनी विद्यार्थ्याना बोलते करून, अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी आत्मविश्वासाने दिलेल्या माहीतीतून त्यांच्यातील उद्योमशीलतेचे कौतुकही त्यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला विद्यार्थ्याचा बिझनेस एक्स्पो राज्यातील पहीला उपक्रम असेल.शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास या उपक्रमातून निश्चित मिळेल आशी प्रतिक्रीया व्यक्त करून उद्योग आणि व्यवसाया करीता आवश्यक असलेले ज्ञान अनुभवातूनच मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांनी सर्वाचे मनापासून अभिनंदन केले.
सहकारातून समृध्दी शिक्षणातून विकास या संकल्पनेतून सुरू झालेला बिझनेस एक्स्पोला मिळालेला प्रतिसाद आमच्या नियोजना पेक्षा अधिक चांगला आहे.खरेदी चांगली होत असल्याने विद्यार्थ्याना आनंद वाटत आहेच.पण त्यांचा माल आणि भांडवल कमी पडू नये म्हणून आम्ही काळजी घेत असल्याचे डॉ सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या.