अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- जिल्ह्यातील अजित पवार गटाचे तीन, तर शरद पवार गटाचे एक अशा चार उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले आहेत. तसेच भाजपनेही चार विद्यमान आमदारांसह माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
उर्वरित मतदारसंघांतील उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र महायुतीत व महाविकास आघाडीतील उमेदवारी तर जाहीर झालीच नाही, पण काही ठिकाणचे जागा वाटपही अजून झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंगळवारी एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना शरद पवार गटाकडून सायंकाळी एबी फॉर्म देण्यात आला आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना यापूर्वीच एबी फॉर्म देण्यात आलेला आहे.
महायुतीत अहमदनगर शहर, कोपरगाव, अकोले. हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळालेल्या आहेत.



