कोल्हार ( वार्ताहर ) :- मंदिरात हनुमंतरायाचे यथाविधी पूजन व जन्मोत्सव सोहळा, आरती, सामुदायिक श्रीराम रक्षा व हनुमान चालीसा पठण, महाप्रसादाचे वाटप, फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली मिरवणूक अशा जल्लोषपूर्ण वातावरणात कोल्हार भगवतीपूर येथे हनुमान जयंती साजरी करण्यात आली. मिरवणूकीतील हनुमान चालीसा फ्लॅश मॉबचा कार्यक्रम ग्रामस्थांसाठी मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
श्री हनुमान जन्मोत्सव समितीच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी कोल्हार भगवतीपूर येथील मंदिरात पारंपारिक पद्धतीने यथोचित पूजा अर्चा व आरती करण्यात आली. सामुदायिकरित्या श्रीराम रक्षा व हनुमान चालीसा पठण झाले. त्यानंतर जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी ५ हजार बुंदीचे पाकिटे ( प्रसाद ) करून घरोघरी, वाड्या – वस्त्यांवर जाऊन वाटप केले.
सायंकाळी मारुती मंदिरासमोरून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमान यांच्या जिवंत देखाव्यांसह मिरवणूकीस प्रारंभ झाला. माजी जि. प. सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुकचे सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, लोणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, देवालय ट्स्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे, विखे पा. कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, धनंजय दळे, शिवधन पतसंस्थेचे अध्यक्ष अजित मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात आला. मिरवणूकी दरम्यान गावातील वंदेमातरम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुंकूलोळ कॉम्प्लेक्स, स्व. माधवराव खर्डे पा. चौक आणि महादेव मंदिरासमोर श्रीरामपूर येथील ग्रुपचा सवाद्य हनुमान चालीसा फ्लॅश मॉबचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम विशेष लक्षणीय ठरला. मिरवणुकीमध्ये छोट्या छोट्या मुला – मुलींना डोक्यावर फेटे बांधण्यात आले. यात महिला – पुरुष, तरुण वर्ग भाविक सहभागी होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे विजय डेंगळे, विक्की डंक, पुष्पक मोहाडकर, वृषभ कोळपकर, सौरभ कुंभकर्ण, गणेश सोमवंशी, प्रसाद दळवी, योगेश बनसोडे, जय कदम, जय जोशी, आदर्श मुनमुने, साई तांबे, शिवराज विखे, सुरज राशिनकर, पप्पू गरगडे, बबलू बर्डे, शुभम गायकवाड, शुभम भाग्यवंत, पवन बोरुडे, दत्तू जाधव प्रयत्नशील होते.
येथील हनुमान मंदिरात गेल्या १६ वर्षांपासून दर शनिवारी संध्याकाळी ७:३० ते ८ वाजेपर्यंत विजय डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालीसा व श्रीराम रक्षा स्तोत्र पठण केले जाते. दिवसेंदिवस यामध्ये युवकांचा व लहान मुला – मुलींचा सहभाग वाढत आहे. दर शनिवारच्या या सेवेसाठी गावातून आणखी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग वाढवावा असे नम्र आवाहन जन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले.