राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):-पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास आणि मतदार संघातील जनतेच्या पाठबळावर पुन्हा एकदा एैतिहासिक विजय मिळवून या भागाच्या विकासा करीता आपण कटिबध्द राहू असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. अर्ज दाखल करण्यापुर्वी महायुतीचे समर्थक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
लोणी बुद्रूक येथे मंत्री विखे पाटील यांनी ग्रामदैवत श्री.म्हसोबा महाराज यांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्या नंतर ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. सर्वांच्या शुभेच्छा स्विकारुन त्यांनी राहाता तहसिल कार्यालयात कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता साध्या पध्दतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अनिल जैन, शिर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी आणि गुजरात विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, या मतदार संघातून सलग सात वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिली आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रती आभार व्यक्त करुन, या भागाच्या विकासाकरीता आपण सातत्याने प्रयत्न केले. या भागातील विकास कामांमुळेच जनतेचे पाठबळ सातत्याने मिळाले. या निवडणूकीतही हा विश्वास सार्थ ठरवू असेही त्यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या माध्यमातून या भागातील विकास प्रक्रीयेला गती मिळाली. उर्वरित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपले प्रयत्न सातत्याने सुरु राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्ज दाखल करण्यापुर्वी मंत्री विखे पाटील यांनी श्री.विरभद्र महाराजांचे दर्शन घेतले. या परिसरात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी मंत्री विखे पाटील यांचे जोरदार स्वागत करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या.