13 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम हा फसवा ठरणार- ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम हा फसवा ठरणार आहे. लोकसभा निवडणूकीच्‍या वेळी खटाखट पैसे देण्‍याचे आश्‍वासन देणा-यांनी आता पर्यंत एकही पैसा जनतेला दिला नाही. महायुती सरकारने एक रुपयात पिक विमा योजना, लाडकी बहीण योजना, कपाशी, सोयाबीनला अनुदान अशा योजनांच्‍या माध्यमातून पटापट पैसे दिले असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील चंद्रापूर, हसनापूर आणि दुर्गापूर येथील मतदारांशी संवाद साधतांना मंञी विखे पाटील बोलत होते. यावेळी कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यातील महायुतीचे सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून झाले आहे. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटीमध्ये सवलत, नमो शेतकरी सन्मान योजना, दुध अनुदान, वयोश्री योजना, आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजना, शेतक-यांना वीज बिलात माफी अशा विविध योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत आधार देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे.

शिर्डी मतदार संघात विकासाची प्रक्रीया निरंतर सुरु आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, पाचशे एकरांमध्ये होणारी औद्योगिक वसाहत यामुळे भविष्‍यात रोजगाराच्‍या मोठ्या संधी आपल्‍या भागात निर्माण होणार आहेत. या औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ आपल्‍या संस्‍थेच्‍या माध्‍यमातून आचार्य कौशल्‍य विकास योजना सुरु करण्‍यात आली असून, हा उपक्रम फक्‍त शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

विकासाच्या गप्पा करणाऱ्यांनी काय विकास केला हे एकदा जनतेला जाहीरपणे सांगण्याची गरज आहे, आपल्या संगमनेरचा विकास आणि शिर्डीचा विकास याची तुलना जनता ही २० तारखेला करणार आहे. केवळ दहशत या मुद्द्यावर निवडणूक लढण्याऐवजी खरी दहशत कोठे आहे हे प्रत्यक्ष जनतेला माहिती आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडी कोर्टात गेली. योजना फसवी आहे असे म्‍हणता मग का या योजनेसाठी आपण अधिकचे पैसे महिलांना देता. आमच्या लाडक्या बहिणी या आमच्या सोबत आहे त्यांना आता कळून चुकले आहे की आम्हीच त्यांचे खरे भाऊ आहोत तेव्हा जनतेच्या मनात महायुतीचे सरकार असल्‍याने भविष्‍यातही सामान्‍य माणसाच्‍या पाठबळावर महायुतीचे सरकार सत्‍तेवर येईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!