संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वा. तळेगाव दिघे येथे माजी मंत्री अमित देशमुख, शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदार संघातून तालुक्यातील जनतेच्या पाठबळावर नव्या वेळेस निवडणूक लढवत असून तालुक्यासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. आमदार थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळग्रस्तांना पाणी दिले आहे. संगमनेर शहरात विविध वैभवशाली इमारत उभ्या केल्या असून शहर हायटेक केले आहे. सहकार, शिक्षण व शेती क्षेत्रातील प्रगतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करून त्यांनी तालुक्याला वैभव प्राप्त करून दिले आहे.
विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य , सुसंस्कृत नेतृत्व म्हणून राज्यभर त्यांची ओळख असून महाविकास आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी पक्षांनी त्यांच्यावर दिली आहे. आमदार थोरात चे महाविकास आघाडीच्या प्रचाराची राज्यभर जबाबदारी सांभाळत आहे. रविवारी सायं. 5 वा. तळेगाव दिघे येथे भव्य युवक मेळावा होत असून या मेळाव्यासाठी संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व माजी मंत्री अमित देशमुख , नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, शिर्डी विधानसभेच्या उमेदवार सौ प्रभावतीताई घोगरे, पै .रावसाहेब खेवरे, अमर कतारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप वर्पे, रिपाईचे बाळासाहेब गायकवाड, यांच्यासह संगमनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते , व युवक काँग्रेसचे सर्व उपाध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी व तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख प्रवक्ते , अभिनेते आणि संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा राज्यभर प्रचाराचा झंजावात सुरू आहे. त्यांच्या भाषणांना राज्यभरातून मोठी लोकप्रियता मिळाली आहे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर सातत्यवत प्रेम राहिले. आमदार थोरात यांनी लातूर आणि उस्मानाबाद सह मराठवाड्यात सातत्याने काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम केले आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या भाषण शैलीची लकब असणारे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची उपस्थिती तरुणांसाठी आनंददायी ठरणारी आहे. नगर दक्षिण मधून जायंट किलर ठरलेले खासदार निलेश लंके हे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. हे महाराष्ट्रातील तरुण युवक नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहोत.
तरी ,या युवक मेळाव्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व युवक व युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवक काँग्रेस ग्रामीण व शहर, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.