नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा विधानसभा मतादरसंघात तिरंगी लढत होत आहे. यामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहेत. मुरकुटे यांना तालुक्यातून पाठिंबा वाढत असल्याने महायुतीसह महाआघाडीची डोकेदुखी ठरलेली आहे. शनिवार (ता.९) रोजी शनिशिंगणापूरसह परिसरात मुरकुटे यांचा प्रचार दौरा असून या दौऱ्यामुळे तालुक्यातील प्रचारात चांगलीच रंगत येणार आहे. सोनई परिसरातील सभेत मुरकुटे काय तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेवासा विधानस सभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शंकरराव गडाख, महायुतीचे विठ्ठलराव लंघे व अपक्ष बाळासाहेब मुरकुटे यांच्यात खरी लढत होत आहे. दोघात तिसरा अन् सगळा विसरा या प्रमाणेच आता लंघे व मुरकुटे यांची अवस्था झालेली आहे. दोघात तिसरा आल्याने निवडणुकीत चुरस वाढलेली आहे. एकट्या माजी आमदार बाळासाहेब मुरकटे यांच्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीत नेत्यांची चिंता वाढलेली आहे.
तालुक्यातील गडाख गटातील नाराज मंडळींचा मुरकुटे यांना पाठिंबा वाढत चालला आहे. हा वाढता पाठिंबा कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. परंतु त्यात त्यांना अपयश येत आहे.त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सर्वसामान्य जनतेने मुरकुटे यांना आमदार करण्याचे स्वप्न पाहिलेले असून ही निवडणूक त्यांनीच हाती घेतलेली आहे. त्यामुळे विरोधक सैरभैर झाल्याचे दिसून येत आहेत.त्यातच आता शनिवारी दिवसभर सोनईसह परिसरातील गावात मुरकुटे यांचा प्रचार दौरा आहे. त्यामुळे या भागातील दौऱ्यात ते काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मुरकुटे यांचा शनिशिंगणापूरमधून दौरा सुरु होणार आहे. त्यानंतर सोनई, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, राजळेवाडी, खेडले परमानंद, शिरेगाव या गावांतील मतदारांशी मुरकुटे भेटी दरम्यान संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात मुरकुटे काय भाषण करणार आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.