लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-भाजपाचे जेष्ठनेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व आणि जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणामध्ये योगदान देणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कै.मधुकरराव पिचड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जेष्ठ व्यक्तिमत्व होतं. अकोले तालुका पंचायत समितीपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जिल्हा परिषदेमध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या समवेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी कार्य केले.
आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी विधानसभेमध्येही संघर्ष केल्याच्या आठवणी आजही स्मरणात आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांचे योगदान अमुल्य होते. सर्वस्पर्शी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण राज्याला होती. विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावताना समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली.
जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी मधुकरराव पिचड यांचे योगदान खूप मोठे होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच लाभक्षेत्राला आज पाणी मिळू शकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत मधुकराव पिचड यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या आग्रही भुमिकेमुळेच धरणाच्या मुखापासून कालव्यांची कामे सुरु होवू शकली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पिचड साहेबांनी घेतलेली सकारात्मक भूमिका ही खूप महत्वपूर्ण आणि कायमस्वरुपती स्मरणात रहाणारी ठरली असल्याचे विखे पाटील यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, तसेच या भागातील आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मधुकरराव पिचड यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलेल्या कार्यामुळेच या भागामध्ये आज विकासाची प्रकीया सुरु झाली. अकोले तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे असे विखे पाटील शेवटी म्हणाले.