कर्जत (प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वर्ष्यातला एक दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.सोशल मिडीयाच्या या आभासी जगात खरी नाती मात्र कवडीमोल ठरताना दिसतआहेत.
ज्याआईवडिलांनी रक्ताचे पाणी करून आपल्या
मुलांना शिकवलं,मोठ केल त्याच आईवडिलांना वृद्धापकाळात मरणयातना सोसाव्या लागत असतील तर यापेक्षा विदारक चित्र समाजात कोणते असेल.असेच एक दुर्दैवी चित्र आज मिरजगाव पोलीस ठाण्यात पाहायला मिळाले.मरणावस्थेला ठेकलेली ९० वर्ष्यांची आजी आपल्या नातवासह आपल्याच पोटच्या पोरांविरोधात तक्रार दाखल करण्यास आली होती.आपल्या मुलांचे सुखी संसार उभारण्यात आपलं अख्ख आयुष्य घालवणारी आजी देवाकडे मृत्यूसाठी विनवणी करताना दिसत होती.
ज्या मुलांना लहानच मोठं केल,नोकरीला लावलं त्याच मुलांनी वृद्धापकाळात सांभाळण्यास नकार दिला याची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.गुरावपिंप्री (ता.कर्जत) येथील यशोदा तुकाराम कवडे यांनी येथील पोलीस ठाण्यात नातवासह येऊन मला इच्छा मरण द्या…मला जगायचं नाही..अशी विनवणी पोलिसांना केली.सदर महिलेची विवंचना पाहून पोलीस देखील भावनिक झाले.यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दाखल करून घेऊन संबधित महिलेच्या दोन नोकरदार मुलांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.यावेळी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,सदर महिलेला तिच्या मुलांकडून वेळोवेळी अपमानित करून क्रूरपणाची वागणूक दिली जात आहे.महिलेला उपाशी ठेवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे.पोलिसांनी देखील याबाबत गांभीर्याने दखल घेऊन सदर वृद्ध महिलेले तिच्या मुलीकडे सांभाळण्यास पाठविले आहे.
“ज्या ठिकाणी वृद्ध व्यक्तींना त्यांच्या मुले व नातेवाइकांकडून छळ, पिळवणूक आणि हेळसांड होत आहे,असे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्या व्यक्तीच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. संबंधित व्यक्तीचे नावे गोपनीय ठेवले जाईल.
आईवडिलांना त्रास दिल्याचे निष्पन्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.”
-सोमनाथ दिवटे,सहायक पोलीस निरीक्षक




