राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- चारचाकी वाहनातून सुमारे २० लाख रूपये रोकड बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना पाठीमागुन चारचाकी वाहनातून आलेल्या चार भामट्यांनी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करून रोकड असलेली बॅग घेऊन भामटे पसार झाले. ही घटना आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात घडली आहे. यामुळे या तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात असलेल्या माऊली दुध प्लांट येथील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघेजण आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सुमारे २० लाख रूपये रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनातून ब्राम्हणी येथील एका बॅकेत भरणा करण्यासाठी जात होते.
यादरम्यान ते राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावरील ब्राम्हणी शिवारातील तांबे वस्ती जवळ असताना एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या चारचाकी वाहनातून आलेल्या चार भामट्यांनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली. त्यावेळी भामटे हाथात लोखंडी रॉड घेऊन वाहनातून खाली उतरले. आणि रोकड असलेल्या वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. तसेच बनसोडे व चालकाला धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून सोनईच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधिकारी बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, हवालदार रोहिदास नवगीरे, वाल्मीक पारधी, नदिम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, अंकुश भोसले, सतीश कुर्हाडे, लक्ष्मण खेडकर यांच्यासह अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आणि आरोपींचा शोध सुरु केला. तसेच अहिल्यानगर येथील ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाली आहेत. गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.