शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिर्डीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली. छगन भुजबळांच्या उपस्थितीमुळे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्याचं बोललं जात होतं. परंतु छगन भुजबळांनी आपली नाराजी कायम असल्याचं आपल्या देहबोलीतून दाखवून दिलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “माझी कोणावरही नाराजी नाही आणि नाराजी हा मुद्दाच नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर आहे, कोणा एका व्यक्तीचे नाही. तसेच छगन भुजबळ यांनी शिबिराच्या नावावरून अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिबिराचे नावच ‘अजित पर्व’ ठेवले आहे. यावरून काय ते कळून घ्या. पक्षात आता एकाधिकारशाही दिसून येते, असे भुजबळ म्हणाले.
तसेच पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होतो, तिथेही एकाधिकारशाही होती. मात्र, तिथे ११ जणांचे मते विचारात घेतली जायची. शरद पवारांच्या पक्षातही होतो, तिथे सगळ्यांचे विचार जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतले जायचे. काँग्रेसमध्येही पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतो. मात्र, आमच्या पक्षात आता कुणाचाच विचार घेतला जात नाही. मी नेहमी स्पष्ट बोलतो आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे.
तसेच,प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या आग्रहावरून शिबिराला हजेरी लावल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल दोन तास शिबिरात होते, तर सुनील तटकरे यांनी फोन करून आग्रह केला म्हणून मी शिबिराला आलो. शिबिरात येऊन मी पाहिले आणि आता साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहे असे ते म्हणाले.