पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर महाविद्यालयाच्या आवारात सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान इयत्ता बारावी मध्ये एकाच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याच्या प्रकार समोर आला आहे. शहरातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात असलेल्या पारनेर महाविद्यालयातील बारावी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोघेही बारावीचे विद्यार्थी आहेत.हल्ला करणारा पारनेर तालुक्यातील कुंभारवाडी येथील आहे तर जखमी विद्यार्थी खडकवाडी ता.पारनेर येथील आहे.काल दि.२४ रोजी महाविद्यालय क्रीडा मैदानावर या दोघांमध्ये किरकोळ वाद झाल्याची चर्चा समोर येत आहे.या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील एकाने जीवघेणा हल्ला केला आहे.हा हल्ला होत असताना सकाळचे वेळेस महाविद्यालयाच्या जिममध्ये पोलिस कर्मचारी व्यायाम करत होते.बाहेर गडबड गोंधळाचा आवाज आल्याने पोलिस कर्मचारी बाहेर आले.त्यांनी कोयत्याने हल्ला करणाऱ्या युवकाला बाजूला करत सदर युवकाला वाचवले.हे पोलिस कर्मचारी या ठिकाणीं नसते तर अघटीत घडले असते.हल्लाखोर युवक पसार झाला आहे.तर जखमी युवकाला पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिस प्रशासन समोर कायदा सुव्यवस्था राखण्याचा मोठे आव्हान निर्माण झाले आहे.