नेवासा फाटा (प्रतिनिधी) श्रीनिवास रक्ताटे:-
नेवासा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी अतीवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पीक विमा कंपन्यांकडून देखील शेतकऱ्यांची थट्टा चालली की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नेवासा तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पिक विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईस विलंब होत असल्याने असंतोषाचे वातावरण आहे. या वादळी वारा व अतीवृष्टी पावसामध्ये गहू, कांदा, हरभरा व इतर पिके जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्यक्ष शेतकऱ्याला या वादळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
त्यामुळे कमीत कमी शासकीय पिक विमा कंपन्यांकडून तरी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने नेवासा तहसीलदारांना देण्यात आले. व ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात विना विलंब वर्ग करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा शेतकरी कुठल्याही क्षणाला नेवासा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करेल तसेच शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे सरकार करत आहे. पीक नुकसान भरपाई व पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्यामुळे पिक विमा कंपनीने उघड उघड शेतकऱ्यांची फसवणूक करून आडमुठे धोरण घेऊन चुकीचे निकष लावून शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापासून कंपनीने वंचित ठेवले आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरी वर्ग विविध संकटाचा सामना करत आहेत, त्यामुळं शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला. त्यातच आता पीक विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडत आहे.
शासनाला शेतकऱ्यांचा जर रोष थांबवायचा असेल तर त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कुठलाही विलंब न करता पीक नुकसान भरपाई व पिक विमा जमा करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जाण्याशिवाय शासनाला दुसरा पर्याय राहणार नाही.
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव, पाचेगाव, पुनतगाव शिरसगाव नेवासा हंडीनिमगाव, खूपटी ,सलाबतपुर, लोहोगाव, झापवाडी ,भेंडा, घोगरगाव, मुकींदपुर ,जैनपूर गावासह तालुक्यातील सर्वच सजांमधील गावांचे पीक नुकसान झाले आहे तहसीलदारांनी या सर्वच सजांमधील मंडलाधिकाऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत करावी असे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याप्रसंगी निवेदन देताना शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले, उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, अशोक नागोडे, नरेंद्र काळे अजय काळे कृषी परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे आदी उपस्थित होते.