राहुरी फॅक्टरी(जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी फॅक्टरीकडून पायी चाललेल्या ५६ वर्षीय व्यक्तीस अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक झाल्याची घटना घडली आहे. गुहा नजीक असलेल्या सेल पेट्रोल पंपाजवळ ही दुर्देवी घटना सोमवारी रात्री घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील रहिवासी जीवन वामन वाघ हा सोमवारी सायंकाळी नगर-मनमाड मार्गावरून राहुरी फॅक्टरीकडून गुहाकडे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
अपघात स्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने जीवन वाघ यास राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषित करण्यात आले.राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी पंचनामा केला आहे.आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अंत्यसंस्कार करण्यासाठी जीवन वाघ याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मयत जीवन याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.