5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगमनेर तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही:-माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा संगमनेर तालुक्यात संतापाची लाट

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):–संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी संगमनेर चा विकास व एकजूट मोडण्यासाठी पूर्णपणे राजकीय उद्देश ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . प्रस्तावित विभाजन हे राजकीय हेतू ठेवून करण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांचा असून संगमनेर तालुक्याची मोडतोड कदापिही सहन करणार नाही असा गर्भित इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यकर्ते व प्रशासनाला दिला आहे.

याबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब.2022 /प्रक्र. 94/म -10, दिनांक 17 जानेवारी 2023 या राजकीय दबावातून काढलेल्या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. खरे तर संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही संगमनेर शहर हे मध्यवर्ती असल्याने सर्वांच्या सोयीचे आहे. याचबरोबर शहरात मध्यवर्ती असे भव्य तहसील व प्रांताधिकारी कार्यालय आहे. मात्र नव्याने प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा डाव आखला जात आहे तो कदापिही सहन केला जाणार नाही.

संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेली गावे देखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे . तालुक्यातील जनतेला राजकीय दबावातून जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सहन करणार नाही. हा स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका असल्याने या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जन आंदोलन उभारले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

नव्याने प्रस्तावित आश्वी  बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयात आश्वी बुद्रुक महसूल मंडळातील आश्वी, प्रतापपूर, उंबरी बाळापुर ,औरंगपूर, सादरपूर ,चिंचपूर बुद्रुक व खुर्द ,निमगाव जाळी, रहिमपूर, ओझर खुर्द ,मनोली या गावांचा समावेश आहे तर शिबलापुर महसूल महसूल मंडळात पानोडी ,आश्वी खुर्द, खळी, पिंपरी लौकी ,अजमपुर ,चनेगाव, झरेकाठी, दाढ खुर्द ,मालूंजे , डीग्रस, शेडगाव, हंगेवाडी यांचा समावेश आहे. पिंपरणे महसूल मंडळात जाखुरी ,अंभोरे, कोळवाडे ,ओझर, बुद्रुक ,कनोली, कनकापूर ,कोल्हेवाडी जोरवे, निंबाळे, वाघापूर ,खराडी, रायते या गावांचा समावेश आहे.

तर संगमनेर शहरानजीक असलेल्या संगमनेर खुर्द या महसूल मंडळात संगमनेर खुर्द, खांडगाव, वैदुवाडी ,चंदनापुरी ,आनंदवाडी, झोळे ,रायतेवाडी, देवगाव ,निमगाव टेंभी, शिरापूर, निमज, सावरगाव तळ, पिंपळगाव माथा, हिवरगाव पावसा या गावांचा समावेश आहे. समनापुर महसूल मंडळात कोकणगाव कोंची, मांची ,शिवापूर ,पोखरी हवेली, कुरण ,वडगाव पान, माळेगाव हवेली सुकेवाडी ,खांजापुर या गावांचा समावेश आहे.

संगमनेर खुर्द व समनापुर हे महसूल मंडळ संगमनेर शहराच्या अत्यंत जवळ आहे .याशिवाय पिंपळगाव माथा ,सावरगाव तळ हे पश्चिमेतील गावे ही आश्वीला जोडले आहेत .तसेच सुकेवाडी ,खाजापुर वडगाव पान हे गावे आश्वीला जोडले आहेत. हा कोणता न्याय आहे असा प्रश्न या गावांमधील नागरिकांनी विचारला आहे

हा अध्यादेश कळतात वरील सर्व गावांमध्ये संतापाची मोठी लाट निर्माण झाली आहे. संगमनेरचा विकास मोडणाऱ्यांनी डाव साधला अशी भावना संगमनेर तालुक्यात निर्माण झाली असून या कुटील कारस्थानाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा गावागावातून दिला गेला आहे.

संगमनेर तालुक्यात संतापाची लाट निर्माण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून राहिला. मात्र महायुतीची सत्ता येताच दोनच महिन्यांमध्ये संगमनेर तालुका तोडण्याचा डाव आखला जात आहे. राजकीय हेतू ठेवून संगमनेर तालुका मोडतोड करण्याचा कुटील डाव समोर आल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाई मध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे. गावागावांमधून निषेध होत असून सोशल माध्यमांवर तालुक्याचा घात झाला. अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. आता हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून संगमनेर तालुक्यामध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!