श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- वाळू तस्करांनी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना पहाटेच्या सुमारास तालुक्यातील गोंडेगाव परिसरात घडली. यापूर्वीही या परिसरात वाळू तस्करांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
गोंडेगाव परिसरातून अवैद्य वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्याने तालुक्यातील दोन तलाठी यांच्याबरोबर मंडलाधिकारी यांचे पथक सदर ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांनी अवैध्य वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेतला. दोन तलाठी डंपर मध्ये बसून डंपर श्रीरामपूरच्या दिशेने घेऊन येत असताना सदर चालकाने डंपर पलटी करून देऊन उडी मारली यामध्ये सदर दोन तलाठी बचावले. नंतर काही वेळाने पुन्हा वाळू तस्कर व महसूल प्रशासनात चांगलीच धुमसचक्री झाल्याची चर्चा परिसरात सकाळी सकाळी सुरू होती. रात्रीच्या सुमारास गुंडेगाव परिसरात पोलीस प्रशासनाच्या अनेक गाड्या फिरत होत्या.
श्रीरामपूरमधील वाळू तस्करांना कुणाचाच धाक राहिलेला नाही. ते बेलगामपणे मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी करत आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून तरुणाई यामध्ये अडकत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच यांना आवर घालावा अशी मागणी परिसरातून होत आहे.