श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – शहरात नगरपालिकेने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आता रेल्वे खात्याने देखील आपल्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून भुयारी रेल्वे पुलाजवळील सय्यद बाबा चौकातील चार टपऱ्या काल तेथून काढण्यात आल्या.
गेले काही दिवस नगरपालिकेनंतर रेल्वे खाते व पाटबंधारे खाते देखील आपले हद्दीतील अतिक्रमणे काढणार असल्याची चर्चा होती. रेल्वे खात्याने ही अतिक्रमणे काढल्याने ही चर्चा खरी ठरत आहे.
सय्यद बाबा दर्गासमोर पूर्वीच्या उर्स मैदानावर टपरी वजा चार दुकाने होती.त्यापैकी नाजिश शाह यांचे अत्तराचे दुकान,राहुल गिरमे यांचे फुलाचे दुकान, सुलेमान टेलर यांचे बॉम्बे टेलरिंग शॉप आणि दिलावर पेंटर यांचे दिलावर आर्ट्स हे पेंटिंगचे दुकान अशी चार दुकाने काढण्याबाबत रेल्वे खात्याने तीन दिवसांपूर्वी नोटीसा दिल्या होत्या.या नोटिसीमध्ये आपण रेल्वे हद्दीतील आपले शेड काढून घ्यावे अन्यथा रेल्वे कायदा कलम 147 नुसार पुढील कारवाई करण्यात येईल असा मजकूर नमूद करण्यात आला होता.आपण स्वतः जर आपली अतिक्रमणे काढली नाही तर रेल्वे विभाग पुढील कारवाई करेल असा इशाराही त्यात देण्यात आला होता.
शहरात सध्या सर्वत्र अतिक्रमण मोहीम जोरात सुरू असल्याने दुकानदार,व्यवसायिक यांनी मोठा धसका घेतला आहे.त्यातूनच आपल्या दुकानाचे नुकसान होऊ नये म्हणून या चार ही दुकानदारांनी आपल्या टपऱ्या काल तिथून हलवल्या.त्यामुळे हा संपूर्ण भाग आता मोकळा झाला असून आता तेथे विस्तीर्ण मैदान दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती घेतले असता या टपऱ्या काढण्याचे दुसरे एक कारण समोर आले आहे. ते म्हणजे या ठिकाणी रेल्वे हद्दीत रेल्वेचे सेक्शन इंजिनियरचे ऑफिस असून त्याला जोडून रेल्वे कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स आहेत. टपऱ्याच्या आडूनतसेच रेल्वे लाईनवर संध्याकाळ नंतर काही चरस गांजा पिणारे रिकामटेकडे लोक त्या ठिकाणी जमा होऊन गांजा ओढत होते. त्याचा उग्र वास आणि आणि त्रास रेल्वे क्वार्टर्स मधील लोकांना होत होता.हवेमुळे तो सगळा उग्र वास त्या परिसरातील घरात ही पसरत असल्याने रेल्वे क्वार्टर्स मध्ये राहणारे कर्मचारी लोक बेजार झाले होते.त्यामुळे त्यांनी रेल्वे खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. तो ही संदर्भ या अतिक्रमण काढण्याला आहे.
दरम्यान शहरातून रेल्वेचे नवीन दोन मार्ग मालवाहतुकीचे होणार असल्याने रेल्वेने दोन्ही बाजू कडची मोठी जागा अधिग्रहित करण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे.या संदर्भात लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांना नोटीसा आल्या होत्या. आता पुन्हा त्या येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रेल्वेसाठी जर जागा अधिगृहित झाली तर संगमनेर – नेवासा रोडची संपूर्ण बाजारपेठ जवळ जवळ उद्ध्वस्त होणार आहे.त्यासाठी पुढील काळामध्ये श्रीरामपूरच्या बाजारपेठेचे नेमके भविष्य काय ? याबाबत नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.