कोल्हार (वार्ताहर):-राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर राहाता तालुक्यात काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असल्याची प्रतिक्रीया तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जुने पदाधिकारी बाळासाहेब खर्डे यांनी दिली.
राहाता तालुक्यात आ.बाळासाहेब थोरात, डाॅ सुधीर तांबे व आ. सत्यजित तांबे यांना मानणारा मोठा वर्ग असुन त्यावरचं राहत्यात काँग्रेसचे अस्तित्व आहे. आत्ताचं तालुक्यात झालेल्या १२ ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही अथवा एकाही गावात पक्षाला संपूर्ण पॅनल देता आला नाही. जे एखादे ग्रा.प सदस्य निवडुन आले त्यांनी तालुक्यातील विरोधकांशी हातमिळवणी केली. याउलट राहात्यातील विरोधी नेते व त्याच्या कार्यकर्त्यांना संगमनेर तालुक्यातील बहुतांश ग्रा.प मध्ये सत्ता काबीज करण्यात यश आले आहे. विषेश म्हणजे त्यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघातील जोर्वे ग्रा.प ची सत्ता देखील त्यांनी मिळवली असुन आता तरी काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
राहाता तालुक्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळेच्या तुलनेत आज राहता तालुक्यात काँग्रेस पक्ष फक्त नावापुरता शिल्लक असुन तालुक्यात कोणतेही संघटन नाही. तालुक्यातील कोणत्याही गावात काँग्रेस पक्षाची, युवक काँग्रेस ची, पक्षाच्या सर्व सेल ची साधी एखादी शाखा देखील नाही. तालुक्यातील केलेल्या पदाधिकारी निवडी याफक्त नावापुरत्या व पदापुरत्याचं आहे. त्याचे अस्तित्व त्याच्यापुरतेचं मर्यादीत आहे त्यांना कुणाशी देणे घेणे नाही. यापुढे तालुक्यात काँग्रेस पक्षाची अशीचं परिस्थिती राहील्यास आगामी येणाऱ्या जि.प, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था पाहवायास मिळाल्यास नवल वाटु नये.
आज जनता हैराण झाली आहे. लोक आपल्याकडं मोठ्या आशा अपेक्षाने पाहत असुन याकडे डोळेझाक होत आहे. नेमकी राहात्यात काँग्रेस ठेवायची आहे की नाही हाचं मोठा प्रश्न आहे. याबाबत अनेकवेळा पक्षाच्या जबाबदार प्रतिनीधीच्या कानावर घातले मात्र योग्य तो सकारात्मक प्रतीसाद मिळाला नसल्याची खंत खर्डे यांनी बोलुन दाखवली.