अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :-सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.
या मागणीसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी गेल्या आठवडयात माध्यमांशी बोलताना सोयाबीन खरेदीसाठी एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सबंधित मंत्र्यांची भेट घेऊन तसे निवेदनही त्यांनी सादर केले हाते. या मागणीची दखल न घेतली गेल्यास संसदेबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
शासनाकडून सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आल्यानंतर या योजनेस पूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अद्यापी अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी मंगळवारी महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेबाहेर केली.
यासंदर्भात बोलताना खा. लंके म्हणाले, शासन सोयाबीन खरेदीसाठी आठ दिवसांची मुदत देते. आठ दिवसांत किती शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होईल ? त्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर शेतकऱ्यांना ते समजण्यात दोन दिवस जातात. त्यात एखादी सुटी आली तर चार दिवसांत काय होणार ?
शेतकऱ्यांना द्यायचे असेल तर मोकळया मनाने द्या या विधानाचा लंके यांनी मंगळवारी पुनरूच्चार केला. सोयाबीन खरेदी झाली नाही तर शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात जाऊन कवडीमोल भावाने काबाड कष्ट करून पिकविलेले सोयाबीन विकण्याची त्यांच्यावर पाळी येईल असे खा. लंके म्हणाले.
या खासदारांचा आंदोलनात सहभाग
खा. सुप्रियाताई सुळे बारामती, खा. नीलेश लंके अहिल्यानगर, खा. ओमराजे निंबाळकर धाराशिव, खा. प्रशांत पडोळे भंडारा, खा. प्रणिती शिंदे सोलापूर, खा. बळवंत वानखडे अमरावती, खा. शिवाजी काळगे लातूर, खा. प्रतिभाताई धानोरकर चंद्रपुर, खा.वर्षाताई गायकवाड मुंबई, खा. कल्याण काळे जालना.