संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):–जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेमध्ये आज 2200 महिलांनी सहभाग नोंदवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला असून देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी काढले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शहर व तालुक्यातील 2200 महिला उपस्थित होत्या. केक कापून सर्व महिलांचा सन्मान करत हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ जयश्री थोरात म्हणाल्या की, भारताला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, मदर तेरेसा , इंदिरा गांधी यासारख्या कर्तुत्वान स्त्रियांचा वारसा लाभला आहे. महिला या कायम कुटुंबा करता दिवसभर काम करत असते. मात्र ती स्वतःकडे कायम दुर्लक्ष करते आणि म्हणून महिलांमध्ये आजार बळवतात. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असून यासाठी चांगला आहार गरजेचा आहे. सशक्त नारी , सशक्त देश या उक्तीप्रमाणे महिला सशक्त असेल तर भारत देश सशक्त होईल असे सांगताना देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे मोठे योगदान असल्याचे त्या म्हणाल्या.
तर सौ दुर्गा तांबे म्हणाल्या की, एकविरा फाउंडेशनच्या वतीने मागील तीन वर्षापासून महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर महिला आरोग्य शिबिरे ,वाचन चळवळ, स्वच्छता अभियान असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहे. यावर्षीच्या महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमारे 3000 महिलांचा असलेला सहभाग हा अत्यंत कौतुकास्पद असून यापुढेही प्रत्येक संकटाच्या वेळी सर्व महिलांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महिलांचे सहा षटकांचे असलेल्या क्रिकेट सामन्यांना महिला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभत आहे याचबरोब रस्सीखेच स्पर्धा ही मोठी रोमांचकारी ठरत आहे.
यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त भव्य केक कापून उपस्थित सर्व महिलांचा एकविरा फाउंडेशनच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . यानंतर बाई पण भारी देवा या गीतांसह विविध प्रेरणादायी गीतांवर झालेल्या झुंबा डान्स मध्ये सर्व महिलांनी सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला.