शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ): – संगमनेर शहरातील भूमिगत गटारी, पाणीपुरवठा, नाले सफाई, स्वच्छता यांसारख्या नागरी समस्यांची तात्काळ दखल घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ऑनलाईन प्रणालींचा अंगीकार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
संगमनेर येथे आयोजित नगरपरिषदेच्या कामकाज आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे व संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे , निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.
संगमनेर शहरातील भूमिगत गटार व पाणीपुरवठा योजनेच्या आढावा घेतांना पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, भूमिगत गटार योजनेच्या कामाला गती देण्यात येऊन त्रयस्थ संस्थेमार्फत कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना उद्भवणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन निपटारा करण्यात यावा. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. नागरिकांच्या तक्रारींचे ऑनलाईन निराकरण करण्यासाठी ॲप तयार करण्यात यावे. वसूल करण्यात आलेल्या वाढीव पाणीपट्टी विषयीच्या तक्रारींची दाखल घेण्यात यावी. पाणी तुंबणाऱ्या भागांची जबाबदारी त्या त्या भागांतील कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात यावी.
नगरपरिषद प्रशासनाने विकासकामे करताना स्थानिक आमदारांच्या सूचनांची दखल घ्यावी. कवी अनंत फंदी नाट्यगृह, म्हाळुंगी पूल, नगर-रोड ट्रक टर्मिनल, दशक्रियाविधी घाटांचे रखडलेले काम वेळेत पूर्ण करण्यात यावे, नगरपरिषदेचे क्रीडा संकुल नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी दिल्या.
पुणे महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाच्या धर्तीवर संगमनेर नगरपरिषदेचा नदीसुधार योजना प्रकल्पाचे काम झाले पाहिजे, सध्या नदी सुधार योजनेचे काम तात्पुरते थांबविण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
आमदार अमोल खताळ यांनीही नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत सूचना दिल्या.
लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार नगरपरिषदेतील वर्ग ४ पदावर दोन सफाई कामगारांना यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधीसाठी पात्र लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.