लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता, चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा पथदर्शी प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि पशुपालकांना आधार देणारा ठरेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने लोणी खुर्द येथे सुमारे २ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीतून राज्यातील पहील्या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जेष्ठ कार्यकर्ते संपतराव विखे पाटील यांच्या हस्ते पूजन करून कुदळ मारण्यात आली. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डाॅ.सुजय विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, चेअरमन नंदूशेठ राठी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी कर्नल महेश शेळके, तुकाराम बेंद्रे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डाॅ.तुंबारे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशात ५३ लाख लिटर दूध उत्पादन राज्यात होते. आज दूध संघापेक्षा दूध संकलक दूध खरेदी करतात. सर्व दूध गुजरात राज्यात जात असल्याने थोडा दिलासा आपल्याला मिळतो. मात्र साॅर्टेड सिमेन्स वापरण्याचे प्रमाण पाहाता येणा-या काळात पशुधन वाढणार आणि अतिरीक्त दूधाचे मोठे आव्हान आपल्या समोर राहील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पशुधनाकरीता लागणारे पशुखाद्य तेवढेच दर्जदार आणि गुणवत्तापूर्ण असले पाहीजे. आज मूरघासा शिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याकडे मका उत्पादन सुध्दा मूर घासासाठी होत आहे. त्यामुळेच चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
पशुसंवर्धन विभागाचे काम पाहाताना पशुखाद्याच्या किंमती कमी करा म्हणून मागणी होत होती. त्यातही अनेक पशुखाद्य कंपन्यांच्या बॅगवर खतामध्ये कोणते घटक आहेत याची माहीती प्रसिध्द करणे बंधनकारक केल्याने त्याचा चांगला परीणाम झाला.
दूध अनुदानाबबात सातत्त्याने चर्चा होते. पण दूध संकलकांनी माहीती न दिल्यामुळेच काही शेतकरी अनुदानापासून वंचित राहीले. अतिरीक्त दूधाचा हिशोब संकलक देवू शकले नाहीत ही बाब समोर आल्याचे गांभिर्य त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राहाता बाजार समितीने केलेल्या कामाचे कौतुक करून भाजी मार्केटमध्ये मागील तीन महीन्यात तीन कोटी रुपयांची झालेली उलाढाल तसेच येणा-या काळात शेती उत्पादीत माल आणि फुलांसाठी कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार आहे. याचा लाभ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
सोयाबीन खरेदीचे चांगले नियोजन झाल्यामुळे तालुक्यातील ५९६ शेतकऱ्यांना ५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. खरेदीची मुदत वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला केलेली विनंती मान्य झाल्यामुळेच खरेदी होवू शकली असे विखे पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी बाजार समितीच्या वाटचालीचा आढावा घेवून बाजार समितीच्या सर्व निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचे समाधान व्यक्त करून कमी कालावधीत केलेली वाटचाल राज्यात आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.