कोल्हार ( वार्ताहर ) :- मनुष्य हा असमाधानी आहे. कितीही धन कमवले तरी मनुष्य समाधानी होऊ शकत नाही. त्याला त्याचे सुख उद्याच्या आशेत दडल्याचे भासत असल्याने तो अशांत असल्याचे विचार युवा किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी व्यक्त केले.
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील मित्र मंडळ, मराठा सेवा संघ, शिवजयंती उत्सव समिती व पाथरे बुद्रुक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. शिवजयंतीनिमित्त पाथरे बुद्रुक येथील महालक्ष्मी माता मंदिरासमोर आयोजित किर्तनप्रसंगी भांबोली, चाकण येथील ह भ प चैतन्य महाराज वाडेकर उद्बोधन करताना बोलत होते. किर्तनप्रसंगी पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.
चैतन्य महाराज वाडेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. लाखोचे सैन्य घेऊन येणाऱ्या अफजल खानला बाराशे सैन्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांची दहशत होती. त्यामुळे आत्ताच्या युवा पिढिने तथाकथित भाईच्या दहशतीपेक्षा शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असेही ते म्हणाले.