अहमदनगर, दि.१५ फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) :- शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या इतर बहूजन कल्याण विभागाच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविली जाते. या योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
धनगर समाज्यातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहांत मर्यादीत जागा असल्याने काही विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहांत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे पुढील शैक्षणीक प्रवेशास मर्यादा येत आहेत. तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरीता शासनाने सन २०१९ पासून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु केलेली आहे.
योजनेचा लाभासाठी विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याला धनगर समाजातील असावा जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने स्वतः हाच आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी सलग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
शैक्षणिक पात्रतेच्या अटींमध्ये विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असावा, इयत्ता १२ वी मध्ये किमान ६०% गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती ६०% असणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
या योजनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास भोजन भत्ता- २८ हजार रूपये, निवास भत्ता- १५ हजार रूपये ३) निर्वाह भत्ता- ८हजार रूपये असे प्प्रती विद्यार्थी ५१ हजार रूपयांची रक्कम देय आहे. योजनेच्या लाभासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सावेडी नाका, अहमदनगर व योजनेच्या अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२४१-२३२९३७८, ई-मेल- [email protected] संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री.देवढे यांनी केले आहे.