इंदूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिमान्यता समितीची दोन दिवसीय बैठक शनिवारी इंदूर येथील हॉटेल शेरेटन ग्रॅण्डमध्ये सुरू झाली. मध्यप्रदेशच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितसंबंध आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या या सर्वोच्च समितीची बैठक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पावन भूमीत होत आहे. बैठकीचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष श्री. यदु जोशी होते. यावेळी महाराष्ट्राच्या जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
जोशी यांनी सांगितले की, इंदूर आणि महाराष्ट्र यांच्यात एक विशेष आत्मीयतेचा संबंध आहे. येथे मराठी भाषिक नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत समितीमार्फत ३५०० हून अधिक पत्रकारांना अधिमान्यता देण्यात आली असून त्यांना ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत. पत्रकारांसाठी राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. अधिमान्यता समितीचे काम म्हणजे आलेल्या अर्जांची सखोल छाननी करून योग्य पत्रकारांना मान्यता देणे. अधिकाधिक पत्रकारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील आहे.
जोशी यांनी यावेळी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार संघटनांशी बैठक घेतली असून, त्यात पत्रकारांच्या पेन्शन, आरोग्यसुविधा आदी विविध मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. मध्यप्रदेशात ही बैठक घेण्याचे एक कारण म्हणजे, येथील सरकार स्थानिक पत्रकारांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक योजना राबवत आहे. या योजनांचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समितीने बैठकीपूर्वी भोपाळ दौरा केला होता. मध्यप्रदेश जनसंपर्क विभागाने समितीला सहकार्य करून कल्याणकारी योजनांची माहिती, त्याचे दस्तऐवज आणि शासन निर्णय (जीआर) उपलब्ध करून दिले. अभ्यास समिती आपली अंतिम अहवाल महाराष्ट्र शासनास सादर करणार आहे.
बैठकीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, कोकण, नाशिक, अमरावती या नऊ विभागांमधून आलेल्या एकूण १२० अर्जांवर निर्णय घेण्यात आला. त्यातील ९३ अर्जांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली, तर २७ अर्ज नामंजूर करण्यात आले.
या वेळी समितीचे सदस्य प्रदीप मैत्र, उदय तानपाठक, एस. एम. देशमुख, दिलीप सपाटे, कृष्णा शेवडीकर, प्रकाश कुलथे, किरण नाईक, नंदकुमार पाटील, स्वप्नील बापट, महेश तिवारी, संजय देशमुख, उनमेश पवार, जाह्नवी पाटील, सविता हरकरे, नवनाथ दिघे, नेहा पुरव, जयेश सामंत, शिवराज काटकर, राजेश मालकर, संजय मलमे, संजय पितळे, शांतनू दोइफोडे तसेच जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक डॉ. किरण मोघे, किशोर गांगुर्डे, सुरेखा मुळे, वर्षा पाटोळे, अनिल अलूरकर उपस्थित होते.



