लोणी ,दि.२३,प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आले असून इयत्ता ९ वी ते १२ वी तील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून विविध राष्ट्रीय विषयांवर चित्र रेखाटत परिक्षेच्या पार्श्वभूमीवर तणावमुक्तीचा आनंद मिळविणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विद्यार्थ्यांचे परिक्षांचे ताण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून ‘परिक्षा पे चर्चा’ हा उपक्रम सुरु केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी शाळा व महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी २७ जानेवारी २०२३ रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकाभिमूख ठरलेल्या या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेकरीता विविध राष्ट्रीय स्तरावरील विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले.
शिर्डी मतदार संघातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये या चित्रकला स्पर्धांचे आयोजन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. परिक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्याचा उद्देश या स्पर्धेच्या आयोजना मागे असल्याचे मंत्री ना.विखे पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग कसा राहील यासाठी माध्यमीक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
‘परिक्षा पे चर्चा’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा उपक्रम हा लोकाभिमुख झाला आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून देशाचे पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सुध्दा सामाजिक दृष्टीकोनातून विचार करतात हा संदेश या उपक्रमातून मिळत असल्याचे मंत्री ना.विखे पाटील म्हणाले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील विविध शिक्षण संस्थाच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.