श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा): – जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या हिंद सेवा मंडळ या संस्थेमध्ये संचालक मंडळातील अंतर्गत वाद हा चर्चेचा विषय ठरला असून या वादाला कंटाळून संस्थेचे मानद सचिव संजय दादा जोशी यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने संस्थेमध्ये खळबळ उडाली आहे.त्यांच्या या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी संचालक मंडळाची आज तातडीची बैठक सायंकाळी पाच वाजता बोलवली आहे. या बैठकीमध्ये जोशी यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.
हिंद सेवा मंडळ सध्या शताब्दी वर्ष साजरा करीत असून संस्थेच्या जिल्ह्यात नगर,श्रीरामपूर, मिरजगाव, अकोले आदि ठिकाणी शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत.या सर्व शाखांमधून चांगला कारभार चालू असताना नगर शहरातील संस्थेची जागा मूळ मालकाला परत करण्याबाबत मागील काही दिवसापासून वाद सुरू आहेत. यावरून संस्थेच्या संचालक मंडळात दोन गट पडले आहेत.विद्यमान संचालक मंडळाने बहुमताने सदरची जागा मूळ मालकाला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.तसा ठराव एकमताने संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु याला संचालक मंडळातील ब्रिजलाल सारडा व इतर काही सदस्यांचा विरोध आहे.
सदर जागेच्या व्यवहारापोटी संस्थेला पाच कोटी रुपये देखील प्राप्त झाले आहेत. या रकमेतून संस्थेच्या इमारती उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. यावरून ब्रिजलाल सारडा व अजित बोरा या दोन विद्यमान संचालकांमध्ये मागील तीन तारखेला झालेल्या बैठकीत मोठी खडा जंगी होऊन हमरातुमरी झाली तसेच एकमेकाचा बाप दाखवण्यापर्यंत मजल गेली. वाद वाढत गेल्याने मानद सचिव जोशी यांनी ती सभा तहकूब केली.परंतु त्याची जिल्ह्यात खूपच चर्चा झाल्याने शेवटी वैतागून संजय जोशी यांनी आपल्या मानद सचिव पदाचा राजीनामा संस्थेचे अध्यक्षांकडे पाठवून दिला.त्यामुळे संस्थेतील मतभेद उघड झाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात तो एक चर्चेचा विषय झाला आहे.
जर मानद सचिव संजय जोशी यांचा राजीनामा मंजूर झाला तर त्याचा संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे.संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये संजय जोशी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर मोठी परंपरा असलेल्या या शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळातील सर्व ज्येष्ठांचा मान राखत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत २०२७ पर्यंत आहे. त्यामुळे सारडा आणि बोरा हे देखील तोपर्यंत संचालक आहेत.इथून पुढे जर प्रत्येक मीटिंगमध्ये वाद होणार असतील तर संस्थेचे कामकाज करणे कठीण होणार आहे.त्यामुळे या वादाला कंटाळून जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.
दरम्यान आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये संजय जोशी यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात यावा, त्याचबरोबर ब्रिजलाल सारडा व अजित बोरा यांचे सारख्या ज्येष्ठ लोकांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता संस्थेच्या हितासाठी दोन पावले मागे येऊन संस्थेचे हित पहावे आणि आपल्या या मतभेदाचा परिणाम संस्थेच्या कामकाजावर होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन संस्थेचे विद्यमान सहसचिव अशोक उपाध्ये यांनी केले आहे.
यासंदर्भात त्यांनी संस्थेचे अध्यक्ष मोडक यांना पत्र पाठवले असून त्यामध्ये हिंदसेवा मंडळाच्या एकूण कारभारामध्ये आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे. ब्रिजलाल सारडा असो किंवा अजित बोरा किंवा इतर संचालक या प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्याने संस्थेचे नावलौकिक वाढवला आहे परंतु सध्या निर्माण झालेले मतभेद हे संस्थेच्या नावलौकिकास शोभणारे नाहीत.त्याचबरोबर संजय जोशी यांच्यासारख्या अजात शत्रू व्यक्तीने जर राजीनामा दिला तर संस्था डबघाईला येण्यास वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त करून संजय जोशी यांचा राजीनामा आजच्या बैठकीत फेटाळण्यात यावा अशी मागणी अशोक उपाध्ये यांनी केली आहे.