जनता आवाज
पिंपरी निर्मळ- (प्रतिनिधी-महेश वाघे) दि.२०
विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात रोज नव्याने घडामोडी घडल्याचे दिसते आहे. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने अधिकृत ए.बी भरून आपला उमेदवार दिला नसून अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदु ठरू पाहत आहे.काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी घोषित असताना डॉ.सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता मुलगा सत्यजित याचा अपक्ष अर्ज भरला. सत्तेतला प्रमुख पक्ष भाजपाने आपला उमेदवारच दिला नाही आणि अजून कोणाला पाठींबा देखील नाही.यामागे बराच मोठा राजकीय भूकंप असण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
मागील टप्यात विधान परिषद आणि राज्य सभेच्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत बंडाची ठिणगी पडली आणि राज्यात सत्तांतर झाल.
यावेळी आ.सुधीर तांबे व अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या बंडा नंतर काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे.भाजपाचे खा.सुजय विखे यांनी याबाबत भाकीत केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील खा.विखें यांनी केलेले सेना फुटीचे व सरकार मधील अस्वस्थतेचे त्यांचे भाकीत खरे ठरले होते.त्यामुळे काँग्रेस फुटीच्या त्यांच्या वक्तव्याला महत्व आहे.
काँग्रेस मधील पहिल्या फळीचे वजनदार नेते आणि गांधी कुटुंबाच्या मर्जीतले माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपले मेहुणे व भाचा यांच्या बंडानंतर शांत आहेत. वैद्यकीय कारणास्तव जरी त्यांची प्रतिक्रिया नसली तरी नाशिक विभागातील त्यांना मानणारे काँग्रेस कार्यकर्ते सत्यजित तांबे यांच्या प्रचारात सक्रिय झालेत.यावरून या बंडास त्यांची मूक संमती आहे काय असा प्रश्न पडतो.
सत्यजित यांना काँग्रेस उमेदवारी मिळवून देणे थोरात यांना अवघड नव्हते.आ.आशिष देशमुख यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून काँग्रेस मधील अंतर्गत खदखद दिसून येते.सूत्रांच्या माहिती नुसार भाजपा काँग्रेस वर सर्जिकल स्ट्राईक च्या तयारीत असून त्याची सूत्र अहमदनगर जिल्ह्यातून फिरत आहेत.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या राज्याच्या राजकारणात ॲक्शन मोड मध्ये असून भाजप देखील त्यांच्या पाठीशी भक्कमपने उभी आहे.अलीकडच्या त्यांच्या मोदी-शहा यांच्या वाढलेल्या भेटी बरच काही निर्देशित करतात.त्यातच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या बद्दल केलेले विधान राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावणारे आहे.
अहमदनगर जिल्ह्यात विखे-थोरात राजकीय संघर्ष असला तरी राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो.म्हणुन भाजपाच्या काँग्रेस वरील स्ट्राईक ची सुरवात संगमनेर मधून झाल्यास नवल वाटू नये.यात थोरात- तांबे कौटुंबिक संघर्ष किंवा राजकीय वारसाची स्पर्धा म्हणने संयुक्तिक ठरणार नाही. कारण सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल करताना बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ.जयश्री यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
भाजपाने देखील सत्यजित तांबे यांनी पाठींबा मागितल्यास देण्याची भूमिका घेतलेली दिसते.प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तशा प्रतिक्रिया दिल्याच आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता-पुत्रांचे निलंबन केले असले तरी तांबे यांचा अपक्ष प्रचार जोरात सुरू आहे.त्यांनी आपल्या सोशल मेडिया च्या विविध माध्यमातून काँग्रेसचा उल्लेख काढलेला आहे.
देशात मोदी लाट सुसाट असून गुजरात निवडणुकीत त्याची परिणीती आली आहे.मागील काळात गुजरात चे प्रभारी असलेले थोरात यावेळी मात्र शांत होते.भाजपाचा विजयाचा वारू पाहता राजकीय निवृत्तीच्या वयात असणार्या विरोधी नेतेमंडळींनी आपल्या वारसांच्या राजकीय भवितव्याची मोर्चेबांधणी भाजपा च्या माध्यामातून सुरू केल्याचे मोठ्या प्रमाणात दिसते. एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर काँग्रेस मध्ये मोठा भूकंप होऊ शकतो अर्थात त्याचा केंद्रबिंदु अहमदनगर जरी असला तरी हादरे नांदेड,पुणे,सातारा,नाशिक, मराठवाडा असे बसू शकतात.
बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वारसदार म्हणुन डॉ.जयश्री थोरात संगमनेर मध्ये सक्रिय झाल्यात. येणार्या काळात सत्यजित तांबे यांची भाजपाशी सोयरीक झाल्यास विधानसभेला जयश्री थोरात काँग्रेस चा हात सोडून कमळ हाती घेऊ शकतात अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.