कोल्हार बु( जनता आवाज वृत्तसेवा):-छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोल्हार बु येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून उस उत्पादक शेतकरी मेळावा व खरीप पीक परिसंवादाची भव्य सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विभाग व तसेच कृषक शेतकरी गट कोल्हार बु यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
हा कार्यक्रम “विकसित कृषी संकल्प अभियान” अंतर्गत दिनांक ०६ जून २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता ज्ञानेश्वर खर्डे पाटील (संचालक, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर ) यांच्या वस्तीवर संपन्न झाला. परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील शास्त्रज्ञांनी ऊस रोप लागवड पद्धत व फायदे, ऊस शेतीतील आधुनिक पद्धती, सुधारित वाण, ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि पीक व्यवस्थान खत व्यवस्थापनाबाबत, ऊसावरील प्रमुख रोग व किडींचे नियंत्रण कसे करावे, यावर शास्त्रशुद्ध माहिती दिली. या कार्यक्रमात विविध आधुनिक शेती पद्धती, सुधारित ऊस वाण, पाण्याचे व्यवस्थापन आणि खतांचे संतुलित वापर यावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले.त्यांनी नैसर्गिक उपाय, फेरोमोन सापळे आणि कीडनाशकांची सुरक्षितता या बाबींवर भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांसाठी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त घेतलेले ‘शिवप्रतिज्ञा संकल्प’, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वराज्य संकल्पनेप्रमाणे प्रामाणिक, पर्यावरणपूरक आणि आधुनिक शेती करण्याचा निर्धार केला.