संजय कोळसे
कोल्हार ( जनता न्यूज ) :- कोल्हार बुद्रुक येथील बसस्थानकाच्या व्यापारी संकुलातील डी एम के ट्रेडर्स या प्लास्टिक व फायबर मटेरियलच्या भव्य दालनास काल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने दुकानातील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. यामध्ये अंदाजे तब्बल ८० लाख रुपये किमतीच्या मालाचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे समजते.
कोल्हार बुद्रुक येथे बस स्थानकाच्या व्यापारी संकुलात ज्ञानेश्वर मधुकर कोळपकर यांच्या मालकीचे डी एम के ट्रेडर्स नावाचे शेती व संसारोपयोगी प्लास्टिक व फायबर मटेरियलचे होलसेल व रिटेल विक्रीचे दालन आहे. मंगळवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्यावेळी नित्यनेमाप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. आगीचे व धुराचे लोळ दुकानाच्या शटरमधून बाहेर येत असल्याचे त्यांना कळविण्यात आले.
त्यापश्चात त्यांनी व आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दुकानाचे शटर उघडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु त्याला यश येत नव्हते. अखेरीस रस्सीच्या सहाय्याने व अन्य मार्गाने ओढून शटर उघडण्यात आले. दुकानाचे शटर उघडताच भडका उडून आगीच्या प्रचंड ज्वाळा बाहेर पडू लागल्या. धुराचे महाकाय लोळ आकाशी झेपावत होते. अग्नितांडवाचा भीषण रुद्रावतार दिसू लागला. सर्वत्र धांदल उडाली.
दुकानात संपूर्ण साहित्य प्लास्टिकचे असल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. दुकानातील माल वितळून भस्मसात झाला. अग्निशामक दलास संपर्क करण्यात आला. त्यानंतर विखे पाटील साखर कारखाना, गणेशनगर साखर कारखाना, तनपुरे साखर कारखाना, राहाता नगरपरिषद, देवळाली नगरपरिषद, श्रीरामपूर नगरपरिषद येथून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. ३ ते ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सुटला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडून बेचिराख झालेले होते. आग इतकी भयंकर होती की दुकानाच्या गळ्यातील लोखंडी ग्ल्डरदेखील वितळून वाकले.
दुकानाच्या नजीकच कुंकूलोळ कॉम्प्लेक्स आहे. सुदैवाने या घटनेमुळे तेथे कोणतीही हानी झाली नाही. घटनेची खबर मिळताच लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, महावितरणचे कोल्हार शाखेचे कनिष्ट अभियंता दिलीप गाढे आदिंनी घटनास्थळी पाहणी करून आढावा घेतला.
घटनेसंदर्भात दुकानमालक ज्ञानेश्वर कोळपकर यांनी लोणी पोलीस ठाण्यात लेखी खबर दिली. त्यात म्हटल्याप्रमाणे, या जळीतामध्ये ७५ लाख रुपये किमतीचे संसार व शेती उपयोगी प्लास्टिक फायबरचे वॉटर जार, मिल्क कॅन व इतर वस्तू. ३५ हजार रुपये किमतीचे दुकानातील लाकडी फर्निचर, मांडण्या, कपाट, इन्व्हर्टर, नोटा मोजण्याचे मशीन. १५ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर बॉक्स. याशिवाय वेगवेगळी महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाले.