शेवगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील जप्त केलेले वाळूचे डंपर पळवणारा तुकाराम विखे यांच्यावर शेवगांवचे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांनी गुन्हा नोंदविला आहे. एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून शेवगाव तहसील कार्यालयाची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची चर्चा आहे .
तहसीलदार कारखिले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध करणे कामी पाच लाख रुपये किमतीचा दोन ब्रास वाळू भरलेला पांढर्या रंगाचा डंपर महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केला होता. तो वाळूचा डंपर
१४ जूनच्या पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून तुकाराम विखे रा. सोन विहीर, ता . शेवगाव, जि. अहिल्यानगर याने स्वतःच्या फायद्यासाठी तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून कार्यालयाची कुठलीही रीतसर परवानगी न घेता लबाडीने पळवून नेला.
याबाबत शेवगाव पोलीसांनी तुकाराम विखे याच्यावर 303, 324 (4)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील डंपर व आरोपी विखे हे फरार असल्याचे तपासी अधिकारी अरविंद चव्हाण यांनी सांगितले.
पोलीस व महसूल विभागाकडून संयुक्त मोठ्या कारवाईची जनतेला अपेक्षा !
शेवगाव तहसील कार्यालयामध्ये वाळू तस्कर व महसूल विभागाचे अधिकारी राजेरोसपणे मित्रासारखे फिरताना दिसत आहेत, तहसीलदारांच्या गाडीमागे वाळू तस्कर दोन चाकी गाड्या कायमच फिरताना दिसतात. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे शेवगाव मध्ये आलेले असतानाही तहसीलदारांच्या गाडीमागे हे वाळू तस्कर राजे रोसपणे फिरत होते. एकंदरीतच महसूल व पोलीस विभागाकडून मोठ्या कारवाईची अपेक्षा जनतेला आहे.
वाळू धंद्यातील आका पर्यंत पोलीस कधी पोहोचणार?
शेवगाव तालुक्यामध्ये वाळू धंद्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस मात्र वाळूच्या काळ्या धंद्यातील आकापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .




Total Users : 644766