श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील नायगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केली. सदर ठिकाणाहून पोलिसांनी 19 लाख 90 हजार रुपयाच्या मुद्देमालासह चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणार्यांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 03 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना, पथकास तालुक्यातील नायगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात दोन इसम ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची माहीती मिळाली. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून पहाणी केली असता, दोन ट्रॅक्टर मजूरांच्या सहाय्याने वाळू भरताना मिळून आले, पथकाने छापा टाकून दोन ट्रॅक्टर चालक करण अशोक वाघ (वय 20, रा.नायगाव), अनिल नारायण आमले (वय 24, रा. गोंडेगाव) तसेच ट्रॅक्टर मालक दत्तात्रय रावसाहेब भवार (रा. गोंडेगाव), आदित्य काकासाहेब दिवे (रा. गोंधवणी, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. वाळू वाहतूक व उपसाबाबतचा परवाना नसल्याने घटना स्थळावरुन 19 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह व दोन मोटार सायकलचा समावेश आहे.
पथकाने ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, रणजीत जाधव, आकाश काळे व रमीजराजा आत्तार आदींनी पार पाडली.