नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा):-संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावरील अपघातप्रवण आणि वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या नेवासाफाटा येथे १०० खाटांचे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे, अशी ठोस मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत केली.
नेवासाफाट्यावरील विद्यमान ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय अपुरे असून, अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही. या भागातून शेंद्रा, वाळूंज, बीड, नाशिक, पंढरपूर अशा औद्योगिक शहरांकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने अपघात वाढले आहेत.
१०८ रुग्णवाहिकेत डॉक्टर नसणे आणि तत्काळ सुविधा न मिळणे ही मोठी समस्या असल्याचे आमदार लंघे यांनी स्पष्ट केले. रुग्णांसाठी वेळेवर प्राथमिक उपचार मिळावेत म्हणून रुग्णालय उभारणी अत्यावश्यक आहे, असे त्यांनी अधिवेशनात स्पष्टपणे मांडले.
या मागणीचे सर्वसामान्य वर्तुळात स्वागत होत असून, हा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडणारे आमदार लंघे हे पहिल्याच ठरले आहेत.