शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डीमधून साडेतीनशे कोटीची गुंतवणूक ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी केली जाते हे माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट असून यामध्ये जवळपास अकराशे नागरिकांनी आपले पैसे गुंतवल्याचे समजते त्यात ७० टक्के साई संस्थानमधील कर्मचारी आहेत त्यापैकी ४ कायमस्वरूपी सेवेत असलेल्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी या कंपनीत पैशाची गुंतवणूक करण्यासाठी एजंटगिरी केल्याचे समजते.
ज्या कोणी या प्रकरणात एजंटगिरी तसेच या पैशाच्या माध्यमातून सावकारकी केली अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या जातील झटपट मार्गाने पैसे कमावण्याच्या अनेक स्कीममुळे नागरिकांचे पैसे बुडीत गेल्याच्या घटना निदर्शनात येऊन देखील नागरिक अशा स्कीममध्ये आपले पैसे गुंतवणतात ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून शिर्डी परिसरातील जवळपास साडेतीनशे कोटींची झालेल्या घोटाळ्याबाबत बोलताना दिली.
याबाबत बोलताना डॉ विखे पाटील म्हणाले गरिबांची पैसे मिळाले पाहिजे ही पालकमंत्री ना. डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका आहे .त्यासाठी आपण प्रयत्न करणार असून परंतु हे पैसे मिळणे अत्यंत कठीण असून यासाठी खूप काळ जाईल लवकर तोडगा निघेल असे नाही.
परंतु ज्या नागरिकांचे यात पैसे गेले त्यांच्या भावना मी समजू शकतो. यात सुदैवाने राजकीय व्यक्ती म्हणून आमचा काही सहभाग नाही आणि नव्हता देखील. नागरिकांनी त्यांचे पैसे परस्पर गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती. आपण जेव्हा निर्णय घेतो त्या निर्णयाचा फायदा होईल किंवा तोटा याचा विचार करायला हवा. यात ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचा सुरुवातीला फायदा झाला अनेकांनी बंगले व गाड्या घेतल्या. ही स्कीम अशीच आहे की सुरुवातीला ही एवढी भावते की आपण पाचच्या जागेवर दहा रुपये गुंतवायला लागतो आणि नंतर त्यात अडकले जातो. आणि हेच शिर्डी बाबतीत घडले दुर्दैवी आहे.
आमच्या संवेदना सर्व गुंतवणूकदारांबरोबर आहोत आम्ही त्यांच्या कठीण काळात त्यांच्या बरोबर आहोत. जेवढे प्रशासकीय बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून लावता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अचानक जर कमाई पेक्षा जास्त पैसा यायला लागला तर समजून घ्यायला पाहिजे की आपण चुकीच्या मार्गावर आहोत. हे सर्वांनाच लागू होतो चुकीच्या मार्गाने आपण गेलो तर त्याचे परिणाम वाईट होतात.
या पैशातून ज्यांनी सावकारकी केली त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. दहा दिवसात त्यांच्यावर कारवाई होताना दिसेल. ही रॅकेट खूप मोठी आहे ही गोष्ट फक्त नंदुरबार पुरती मर्यादित नसून एकमेकांवर विश्वास ठेवून अनेकांनी यात पैसे गुंतवले. यातून एकच गोष्ट घेण्यासारखी आहे की आपण आपल्या कामातून मिळालेल्या पैशातच समाधानी राहिली पाहिजे. नाहीतर वेगळ्या मार्गाने पैसे कमवायच्या नादात आपले आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते हे या गोष्टीतून सिद्ध झाले असल्याचे सांगत डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत ग्रुप मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून झालेल्या साडेतीनशे कोटी घोटाळ्या बाबत बोलताना आपले विचार स्पष्ट केले.