लोणी(जनता आवाज वृत्तसेवा) :- राहाता तालुक्यातील लोणी जवळच्या मूळगाव गोगलगाव (रा. सादतपूर) शेतकरी असलेल्या पती-पत्नीचा गुरुवारी एकाच दिवशी गूढ मृत्यू झाला. पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा स्वतःच्या घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला. मृत्यू मागे घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांना घ्यावा लागेल.
रेवजी मुरलीधर गायकर (वय 60) व त्यांची पत्नी नंदा गायकर (वय 55) यांचा गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने गोगलगावात पती-पत्नीचा गूढ मृत्यू खळबळ उडाली. गावापासून जवळच सादतपुर हद्दीत गायकर बस्तीबर राहणारे रेवजी गायकर हे शिक्षण संस्थेत नोकरीत होते. पत्नी, एक मुलगा, तीन मुली असे त्यांचे कुटुंब, चारही मुलांचे विवाह झाले. मुली त्यांच्या सासरी गेल्या तर मुलगा नोकरीसाठी संभाजीनगरला गेला. घरी पती-पत्नी दोघेच होते. रेबाजी यांनी तीन वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत नोकरी सोडली. त्यांना पेन्शनही मिळू लागली, पोटापुरती शेती असल्याने दोघे शेतातील कामे करून चांगले जीवन जगत होते.
त्यांची एक मुलगी निमगावबाळी ता. संगमनेर येथे सासरी राहाते. तिने गुरुवारी सकाळपासून अनेकदा आई-वडिलांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही, शेवटी तिने जवळच राहणाऱ्या चुलत भावाला संपर्क साधून विचारणा केली. चुलत भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता दरवाजा अर्धवट उघडा दिसला. आवाज देऊनही काहीच प्रतिउत्तर न आल्याने दरवाजा पूर्ण उघडून बघितले असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. राहाता तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष त्र्यबंक गायकर घटनास्थळी पोहचले, परिस्थिती लक्षात येताच त्यांनी आश्वी पोलिसांना कळवले.
दरम्यान, घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदाबांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करून ते प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर गोगलगाव येथील स्मशानभूमीत अधिसंस्कार करण्यात आले. घटनेने गोगलगावमध्ये शोककळा पसरली आहे.