श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा): – शहरातील विविध प्रभागांमध्ये पार पडलेल्या बहुउपयुक्त आणि दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या विकास कामांचे लोकार्पण सोहळे नुकतेच जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात शहराच्या विविध भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण, अंगणवाडीची नव्याने उभारलेली इमारत, दशक्रियाविधी घाटाचे सौंदर्यीकरण आणि पाणीपुरवठा साठवण तलावाची पाहणी असे महत्त्वपूर्ण घटक समाविष्ट होते.
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ६, १३ आणि १५ या भागातील कामांचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. प्रामुख्याने गोंधवणी रोडचे रुंदीकरण, स्वप्न नगरी परिसरातील पाणी टाकीची पाहणी, पूर्णवाद नगर आणि गोविंद नगरमधील डांबरीकरण, तसेच बोंबले वस्ती, मोरगे वस्ती, झेंडा चौक, स्वामी समर्थ केंद्र परिसरातील रस्त्यांचे लोकार्पण हे कार्य शहराच्या नागरी सुविधांचा दर्जा उंचावणारे ठरले. प्रभाग क्रमांक १३ मधील नॉर्दन ब्रांच येथील दशक्रिया विधी घाटाचा सुशोभीकरण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला असून, या घाट परिसराचा सुधारित स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे धार्मिक व सामाजिक विधींसाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधा युक्त वातावरण लाभणार आहे. या विकास कामांमुळे शहरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण नागरी सुविधा उपलब्ध होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन दिनकर, माजी सभापती दीपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, प्रशासक किरण सावंत, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे, मा. उपनगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, रवी पाटील, केतन खोरे, स्नेहल खोरे, आशिष धनवटे, श्रीनिवास बिहानी, शशांक रासकर, स्नेहलता खोरे, जयश्री शेळके, भारती कांबळे, पुष्पलता हरदास, शामलिंग शिंदे, मनोज लबडे, कैलास दुबय्या, सनी सानप, बंडू कुमार शिंदे, संजय गांगड, दिपक चव्हाण, वैशालीताई चव्हाण, सोमनाथ गांगड आदींसह भाजपचे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराच्या सर्व भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे सहकार्य लाभत असून, त्यातूनच श्रीरामपूरसारख्या वाढत्या शहरासाठी पायाभूत सुविधांचा मजबूत पाया रचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे पार पडले असून, उपस्थित मान्यवर व नागरीकांच्या सहभागातून हा लोकार्पण सोहळा विकासाची दिशा दर्शवणारा ठरला. आगामी काळातही अशा योजनांचा लाभ सर्व प्रभागांना मिळावा, ही शहरवासीयांची अपेक्षा आहे.