कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथील टपरी गाळेधारक संघटना व व्यापारी असोसिएशन तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने देवळाली प्रवरा येथील महावितरणच्या शाखा कार्यालयात येथील उप कार्यकारी अभियंता शैलेंद्र बागरे व कोल्हार येथील महावितरण शाखा चे कनिष्ठ अभियंता जितेंद्र राजपूत यांना वीज प्रश्नांसंदर्भात लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.याप्रसंगी कोल्हार येथील व्यापारी शेतकरी ग्रामस्थ प्रतिनिधी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात प्रामुख्याने सात मुख्य मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये गावात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा खंडित होऊ नये, व्यावसायिक वीजधारकांना सौर वीज अनुदानाचा लाभ व्हावा,
होल्टेज नियंत्रित असावे ते अनियंत्रित असल्याने विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होते, व्यावसायिक व घरगुती वीज बिलातील स्थिर आकार रद्द करावा, मुळा प्रवराचे जुने स्ट्रक्चर बदलावे, स्मार्ट मीटरची सक्ती नको त्यासाठी सर्वात आधी मीटर धारकाची परवानगी घ्यावी, तिसगाव फिडर पूर्ण क्षमतेने चालवून येथील शेतकऱ्यांना योग्य दाबाने दिवसा वीज पुरवठा करावा. यामुळे शेतकऱ्यांचे वारंवार होणारे नुकसान टळेल .
दरम्यान वरील मागण्यांचे निवेदन पत्र स्वीकारल्यानंतर उप कार्यकारी अभियंता श्री शैलेंद्र बागरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना म्हटले की माझ्या आखत्यारीत येणाऱ्या सर्व मागण्या मी लवकरात लवकर म्हणजे 1 ऑगस्टपर्यंत सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न करेल तसेच माझ्याआखत्यारीत नसलेल्या मागण्यांसाठी वरिष्ठांकडे त्या संदर्भात पाठपुरावा करेल. तसेच वेळप्रसंगी कोल्हार येथे प्रत्यक्ष एक दिवस पूर्ण वेळ येऊन प्रश्नांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान येथे निवेदन दिल्यानंतर 1 ऑगस्ट पर्यंत वरील मागण्यासंदर्भात कारवाई न झाल्यास आम्ही कोल्हार येथे मोठ्या संख्येने जमा होऊन चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा टपरी गाळाधारक संघटनेचे अध्यक्ष शिव कुमार जंगम यांनी उप अभियंता शैलेंद्र बागरे व कनिष्ठ अभियंता जितेंद्र राजपूत यांना स्पष्ट शब्दात दिला व त्याच बरोबर घोषणाही दिल्या.
याप्रसंगी कोल्हार येथील टपरी गाळाधारक संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार जंगम, उपाध्यक्ष तुषार बोऱ्हाडे, खजिनदार अनिल कांकरिया, उमर भाई शेख, महेश फलटणे,किशोर निबे, अशोक खर्डे, योगेश कोळपकर, संतोष जंगम,महेश घुले,सागर शेळके, निलेश घुले निहाल शेख ग्रामस्थ आदी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.