अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत शाळा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी हा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढविणाऱ्या असून त्यात तातडीने सुधारणा करून शाळा मूळ वेळेनुसार सकाळी ७.३० ते ११.३० अशी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ग्रामीण पालकांची अडचणी खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, नगर जिल्ह्यातील बऱ्याच प्राथमिक शाळा या खेडयांमध्ये, वाडया-वस्त्यांवर आणि शेतकरी समाजाच्या मुख्य वास्तव्याच्या भागात आहेत. येथील पालकांपैकी बहुसंख्य पालक दुपारी शेतात मजुरी किंवा शेतीची कामे करत असतात. त्यामुळे शाळेची वेळ जेंव्हा ९ ते १.३० अशी ठेवली जाते तेंव्हा विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे व परत आणणे हे पालकांसाठी कठीण व गैरसोयीचे ठरते. तसेच अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा अभाव, सार्वजनिक वाहनांची अनुपलब्धता आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुलांची शाळेतील नियमित उपस्थितीही कमी हेते अशी वस्तुस्थिती अनेक शाळांमधून दिसून येत आहे.
शिक्षक संघटनांचेही पाठबळ
या वेळेच्या बदलाविरोधात जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनीही वेळ पूर्ववत करण्याची मागणी वारंवार केली आहे. शिक्षकांच्या मते सकाळी लवकर शाळा घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये अधिक उर्जा असते, शैक्षणि उप्रमक रचनात्मक पध्दतीने राबविता येतात, आणि दुपारच्या वेळेत त्यांना अभ्यास, घरगुती कामे किंवा शेतामध्ये कामासाठी वेळ देता येतो.
शैक्षणिक व आरोग्यदृष्टया सकारात्क परिणाम
खा. लंके यांनी आपल्या पत्रामध्ये समर्थन केले आहे की, शनिवारी सकाळी शाळा लवकर सुरू झाल्यास योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, खेळांचे उपक्रम, शारीरिक कवायती अशा आरोग्यदायी गोष्टी सुसज्ज वातावरणात राबविता येतात. त्याचप्रमाणे शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत मुलांमध्ये सृजनशीलता वाढविणारे विविध उपक्रम-कथाकथन, निबंध लेखन, चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रयोग हेही या वेळेत प्रभावीपणे घेता येतात.