कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक या ठिकाणी प्रवरा नदीच्या पुलावर एका ट्रकने सायकलस्वराला जोराची धडक दिल्याने सायकलस्वार ट्रक खाली सापडून चिरडून जागी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली.या अपघातात सलीम बाबू शेख वय 63 वर्ष रा. अंबिकानगर कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू ट्रक क्रमांक RJ 19 GH 2785 हा नगरच्या दिशेने जात असताना कोल्हार येथील प्रवरा नदीच्या पुलावर हा अपघात झाला.या अपघातात सायकल स्वारास ट्रकने धडक दिल्या नंतर ट्रक चे चाक सायकलस्वाराच्या अंगावरून गेल्याने सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला.अपघाता नंतर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.प्रवरा नदी पुलावर वाहतूकीची कोंडी होत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी लोणी पोलिस ठाण्याने वाहतूक पोलिसाची नियूक्ती करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
अपघाता नंतर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिनीतून शेख यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. अपघता नंतरही लोणी पोलिस ठाण्याचा एक हि कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाला नाही. वाहतूक विसकळीत झाल्याने वाहतूक कोंडीचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. याअपघातामुळे समांतर पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.