संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा) :- आधुनिकतेच्या काळात पारंपरिक बीजसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या पोपेरेवाडी येथील देशी सेंद्रिय बियाणे बँकेला वृंदावन कृषी महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार येथील कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली.
या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना स्थानिक बीजांचे महत्त्व, त्यांचे जतन व संवर्धन याबाबत प्रत्यक्ष ज्ञान मिळावे हा होता. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी विद्यार्थ्यांना विविध पारंपरिक बियाणांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक बियामध्ये भविष्यातील अन्नसुरक्षेचे बीज दडलेले आहे. स्थानिक हवामानाला साजेशी, रोगप्रतिकारक क्षमता असलेली ही बियाणी पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
विद्यार्थ्यांनी राहीबाई यांच्याशी संवाद साधताना बियाण्यांचे संकलन, साठवणूक, नोंदवही पद्धती, बीजोत्पादन आणि बीजसंवर्धनाचे तंत्र याबाबत सखोल माहिती घेतली. त्यांनी संग्रहित केलेल्या 1५० पेक्षा अधिक देशी जातींच्या बियाण्यांचे प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थ्यांनी थक्क होण्यासारखा अनुभव घेतला.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक शेतीच्या दृष्टीने नवचैतन्य निर्माण झाले असून स्थानिक बियाण्यांच्या महत्त्वाविषयी जाणीवपूर्वक विचार करण्याची प्रेरणा मिळाली.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक शेतीच्या दृष्टीने नवचैतन्य निर्माण झाले असून स्थानिक बियाण्यांच्या महत्त्वाविषयी जाणीवपूर्वक विचार करण्याची प्रेरणा मिळाली.
यासाठी संस्थेचे सचिव मा. आर.आर गुंजाळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बि.उंबरकर, प्रा. पि.डी.शिंदे, प्रा.डि.बी.गोलांडे, प्रा.ए.एन.सहाने, प्रा.पि.एस. हापसे, प्रा.एस.पी.कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा पार पडला.