अहिल्यानगर,(जनता आवाज वृत्तसेवा): – कारगिल युद्ध हे भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्याग व बलिदानाचे प्रतीक आहे. तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम व अभिमान निर्माण व्हावा, यासाठी दरवर्षी कारगिल विजय दिन साजरा केला जातो, असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो – अहिल्यानगर यांच्यावतीने तसेच श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, माजी सैनिक आर. बी. घोडके स्मृती प्रतिष्ठान (महाराष्ट्र प्रांत) व सूर्यतेज संस्था – कोपरगाव यांच्या विशेष सहभागातून शिर्डी येथील साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलामध्ये कारगिल विजय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाडीलकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. फणिकुमार, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, साईबाबा संस्थानाचे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, मेजर प्रमोद धापटकर, प्राचार्य डॉ. संतोष औताडे, प्रा. विकास शिवगजे, मुख्याध्यापिका जहॉआरा मिरजकर, आशिफ तांबोळी, शिल्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
गाडीलकर म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने केवळ नोकरी किंवा व्यवसायाचे स्वप्न न पाहता देशसेवेचे भान ठेवणे गरजेचे आहे. एनसीसी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा निर्माण करतो. हे प्रशिक्षण केवळ शारीरिक क्षमतेपुरते मर्यादित नसून जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य करते. संस्थानच्या शैक्षणिक संकुलामधून देशभक्त, संवेदनशील आणि जबाबदार तरुण घडवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे लवकरच साईबाबा शैक्षणिक संकुलामध्ये एनसीसी अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
यावेळी प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी झालेले साकुरी येथील सेवानिवृत्त मेजर प्रमोद धापटकर यांनी युद्धातील थरारक अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले. ते म्हणाले, भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यामुळे ८४ दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर, २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.
घोडके म्हणाले, कारगिल युद्धातील सैनिकांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी व युवकांनी देशसेवेसाठी कटिबद्ध व्हावे.
कार्यक्रमात भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेचे दर्शन घडविणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर व कारगिल विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तिपर गीतगायनाचा कार्यक्रम व कारगिल युद्धातील सहभागी जवानांचा सत्कारही याप्रसंगी झाला. कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
विजय दिनानिमित्त साईबाबा संस्थानच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला, पोस्टर, वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव श्री. गाडीलकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्री साईबाबा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर समूहगीत सादर केले.
या कार्यक्रमात साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील कन्या विद्यालय, इंग्रजी माध्यम शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. पी. फणिकुमार यांनी केले. सूत्रसंचालन वसंत वाणी यांनी केले.