कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय, कोल्हार बु. येथे नुकतीच वर्ग प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रिया काय असते मतदान केंद्र मतदान अधिकारी यांच्या समवेत मतदान कसे करावे याबद्दलचे धडे वर्गनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने होणारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेतून प्रत्येक वर्गाचे वर्ग मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून शालेय वर्ग मंत्री मंडळाची निवडणूक घेण्याचे नियोजन केले गेले. ईव्हीएम मशीन तयार करून प्रत्यक्षात डिजिटल बोर्ड तयार करण्यात आले.
इच्छुक उमेदवाराची घोषणा करण्यात आली. उमेदवारांना चिन्ह देण्यात आले व आपल्या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी दोन दिवसाची वेळ देण्यात आली विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीन वर मतदान कसे करावे याची माहिती वर्गातून इंटरक्टिव्ह बोर्डवर देण्यात आली. तसेच आदल्या दिवशी प्रचार प्रसार थांबवून आचारसंहिता देखील पाळण्यात आली.मतदान अधिकारी आणि केंद्राध्यक्ष यांच्या उपस्थितीत मतदान गोपनीय पद्धतीने घेण्यात आले. अधिकाऱ्यांचे कामकाज काय असते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
बॅलेट बटन दाबताच पसंतीच्या उमेदवारा पुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज येतो ही प्रक्रिया अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होते. मतदान करताना ओळखपत्रा साठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स सक्तीने आणण्यास सांगितले होते.
मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन विद्यार्थी भारावून गेले.या निवडणूक कार्यक्रमाचे उदघाटन स्कूल कमिटी सदस्य संतोष थेटे पा., योगेश कोळपकर, गणेश सोमवंशी, वसंत भोसले, सुभाष कोंडेकर यांच्या शुभहस्ते झाले विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुशराज जामदार उपमुख्याध्यापक सिताराम बोरुडे पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली.
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून शब्बीर शेख यांनी जबाबदारी पार पाडली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मच्छिंद्र मोहोंडुळे, सुधीर फुलारी, दीपक मगर यांनी काम केले.शुभम पवार, तेजस शेलार, ऋषिकेश जाधव, महेश जगधने यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व वर्ग प्रतिनिधींची ढोल ताशाच्या गजरात शाळेच्या मैदानावर मिरवणूक काढण्यात आली.