लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-अहील्यानगर उत्तर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या भंडारदारा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भंडारदरा धरणास आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्याचा निर्णय यापुर्वीच केला होता.धरणास यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.धरणाचे शंभरावे वर्ष या भागाच्या विकासात्मक दृष्टीने साजरे व्हावे आशी संकल्पना जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील मांडून त्याची कार्यवाही सुरू केली आहे.
शताब्दी महोत्सव समिती स्थापन करून भंडारदरा जलाशयाचे संवंर्धन आणि या भागातील पर्यटनाला संधी निर्माण करून देण्याच्या उपाय योजनांच्या सूचना आणि त्यादृष्टीने कराव्या लागणार्या उपाय योजनांसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आढावा घेण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून,या समिती मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे मुख्य सचिव जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
अकोले तालुक्याच्या नैसर्गिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणाची निर्मिती झाली.या धरणामुळे उतर जिल्ह्याच्या अकोले संगमनेर राहाता श्रीरामपूर नेवासा या तालुक्यांतील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली.या भागातील कृषी सहकार आणि अर्थिक विकासाला मोठे पाठबळ मिळाले.यामुळे जिल्ह्याचा विकास होवू शकला.
भंडारदरा जलाशयाचे संवंर्धन करतानाच या भागातील पर्यटन विकासासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न सुरू केले असून प्राथमिक आराखडा तयार होत आहे.पर्यटन विकासामुळे या भागात रोजगार निर्मिती होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शताब्दी वर्षाच्या निमिताने याबबातचे सर्व निर्णय होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेली समिती महत्वपूर्ण ठरणार आहे.
भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून भंडारदरा जलाशयाचे संवंर्धन आणि पर्यटन विकासाला अधिकचे पाठबळ मिळेल आशी प्रतिक्रीया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.