25.8 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

सौर ऊर्जा प्रकल्प संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):– शासनाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्याला भारनियमनमुक्त करण्याचे धोरण स्वीकारले असून, तालुक्यातील आठ गावांसाठी सुरू झालेला सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रावर मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार आदी होते. हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री विखे पाटील यांनी सौर प्रकल्प कार्यान्वित केला.

कर्हे परिसरातील शासनाच्या २५ एकर जागेवर ६ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे निमोण उपकेंद्राखालील पळसखेडे, निमोण, कर्हे, सोनेवाडी, पिंपळे, सोनोशी, बिरेवाडी व नान्नजदुमाला या आठ गावांतील १,८५७ शेतकऱ्यांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सातत्याने वीजपुरवठा होणार आहे.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेला विकास प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग मानले असून, राज्यातील भारनियमनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेचा दुसरा टप्पा सध्या कार्यान्वित असून, संगमनेर तालुक्यातील हा पहिला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.”

ते पुढे म्हणाले, “शासनाने यापूर्वीच ७ अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांसाठी शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील भारनियमन हटवण्यासाठी सौर ऊर्जेचे जाळे अधिक विस्तारित केले जात असून, या धोरणात कृषी क्षेत्रासह घरगुती व व्यापारी ग्राहकांनाही सामावून घेतले जात आहे.”

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!