24 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैजापूर (जनता आवाज वृत्तसेवा):-सदगुरु संत गंगागिरी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या या भागातील भाविक नागरिकांच्या विकासाठी देवगाव शनि येथील उच्च पातळी बंधारा बांधकाम व सरला बेट विकास आराख़डा यांना मंजूरी देऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगाव शनि येथे दिले.

देवगाव शनि ता. वैजापूर येथे सदगुरु संत गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची सांगता आज झाली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री (गोदावरी, कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, संत रामगिरी महाराज, जलसंपदा मंत्री (तापी, विदर्भ, कोकण) गिरीश महाजन,आ. रमेश बोरनारे,आ. विठ्ठल लंघे,सुरेश चव्हाणके, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र,पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अन्य अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतून येतांना समुद्राचे दर्शन होते त्याप्रमाणे इथे आल्यावर भाविकांच्या सागराचे दर्शन झाले. १७८ वर्षांची परंपरा असलेला हा अध्यात्मिक सोहळा, भाविकांची शिस्त, तत्परता, त्यांची भाविकता हे सगळं मनाला विलक्षण आनंद देणारे आहे. देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात तेव्हा हे सांस्कृतिक आक्रमण थोपविण्यासाठी संत शक्ती मैदानात उतरते. संतांच्या विचारांचे महत्त्व त्याचमुळे अबाधित आहे.याच विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेचे स्वराज्य मिळविले. अध्यात्माच्या शक्तीमुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि मला सकारात्मक कार्याची प्रेरणा मिळते.

या भागातील सरला बेटाचा विकास करण्यासाठी १०९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात येईल. तसेच देवगाव शनि येथील उच्च पातळी बंधाऱ्याची मागणीही आम्ही लवकरच पूर्ण करु असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच या सोहळ्याला दरवर्षी येईन असेही आश्वासन दिले.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, वारकरी संप्रदायाने जगाला विशाल दृष्टीकोन दिला.हीच आपली खरी संस्कृती आहे. संत गंगागिरी महाराजांच्या या पवित्र स्थानावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी १ एकर जागेवर मोठे सभागृह बांधण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, याभागातील उच्च पातळी बंधारा बांधकामाच्या मागणीला मी दुजोरा देतो. या भागातील या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. याभागातील अध्यात्मिक चळवळ ही आम्हा सगळ्यांना मार्गदर्शक आहे.

१७८वर्षाची परंपरा असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज सांगता सोहळा अर्थात काल्याचे कीर्तन होते. त्यास मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यरांनी हजेरी लावली. यावेळी मोठ्या संख़्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे सप्ताह समितीतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री महोदय व मान्यवरांनी फुगडी खेळून सांगता सोहळ्याचा आनंद लुटला.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!