लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):- सहकार म्हणून देशाचा जेव्हा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचे नाव आधी येते आणि महाराष्ट्राचा जेव्हा विचार होतो तेव्हा पद्मश्रींच्या नावाची आठवण नक्की येते असे उद्गार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवरानगर येथे येवून पद्मश्रींच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन, अभिवादन केले. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या देशातील पहिल्या प्रवरा पब्लिक स्कुलच्या नवीन ऑडीटोरीयम हॉलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, डॉ.राजेंद्र विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अनिल मोहीते, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्यासह प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री मोहोळ म्हणाले की, पद्मश्रींनी सुरु केलेल्या सहकार चळवळीतून या भागात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झाला. विखे पाटील परिवाराचे सर्वच क्षेत्रांमध्ये असलेले योगदान खुप मोठे आहे. पिढ्यांपिढ्या हा वारसा या परिसराने जोपासला असल्याचे सांगून त्यांनी सहकार चळवळ आणि या भागात रुजविली.
देशात आज ज्या सहकार विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतो त्या कार्यालयात पद्मश्रींचे छायाचित्र हे आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. कारण ज्या ज्या वेळी देशातील सहकार चळवळीचा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचे नाव आधी निघते आणि महाराष्ट्राचे नाव घेतले जाते तेव्हा पद्मश्रींची आठवण आवर्जुन होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवरा परिवाराच्या वतीने मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वागत करण्यात आले.