कर्जत(जनता आवाज वृत्तसेवा):-कर्जत शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा तीन दिवसांचा हा पावसाचा सिलसिला सुरू असून, विशेषतः रविवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले. यामुळे मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. अवघ्या एक तासात शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काही उपनगरातील घरांमध्ये देखील पाणी शिरले याची माहिती मिळाली. तर मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरले.
मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर पकडला असून, या सततच्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये पिकांच्या नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक शेतांमध्ये उभ्या पिकांवर पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकरी रमेश जाधव यांनी सांगितले, “सोयाबीन आणि उडीद पिके आता फुलोऱ्यात आहेत. इतका सतत पाऊस झाला तर मुळांना पाणी साचेल आणि रोगराई वाढेल, ज्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.”
मुख्य रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचे नियोजन करा महेश जेवरे
शहरांमध्ये मुख्य रस्त्यावर पाऊस पडल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. अतिशय दूरवरून पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एवढ्या थोड्याशा पावसाने जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येत असेल तर जास्त पाऊस झाला तर मोठा धोका निर्माण होईल यामुळे रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचे नियोजन प्रशासनाने करावे.