कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):-उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी माझा भारत देश घडविला.गुरुकुल संपदा विद्यालयात स्वतंत्र दिनाचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता सर्व विद्यार्थी , शिक्षक ,पालक स्कूलच्या प्रांगणात उत्साहाने जमले होते . सर्वप्रथम इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेल्या माजी विद्यार्थिनी पलक रांका हिच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
त्यानंतर सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. भारतीय संविधानाचे वाचन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गौरी घोडे हिने केले .संपूर्ण परिसर ‘वंदे मातरम’ व ‘भारत माता की जय’ या घोषणांनी दुमदुमून गेला. ध्वजारोहणानंतर शाळा व्यवस्थापन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शाल ,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्री प्रायमरी, प्रायमरी आणि सेकंडरी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूह गायन, नृत्य ,देशभक्तीपर भाषणे यामध्ये शाहीर अनुष्का, देवकर साईश्वरी, वेदांती कानडे तसेच अनिल नलगे सर यांनी आपले विचार प्रकट केले .तसेच लहान मुलांनी सादर केलेल्या देशभक्तीपर कवितांनी उपस्थितांचे मन जिंकले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून प्रत्यक्ष स्वातंत्र्यसैनिकांचे दर्शन घडवले व त्यांच्या स्फूर्ती जाग्या केल्या.
शाळेचे मुख्याध्यापक सुधीर आहेर सर यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यसैनिकाच्या बलिदानाची आठवण करून दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम ,अनुशासन, कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रम यांचे महत्त्व पटवून दिले .तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण,विज्ञान, तंत्रज्ञान व संस्कार यांचा योग्य उपयोग करावा असे आवाहन केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी देशभक्तीच्या वातावरणात संपूर्ण विद्यालय गुंगून गेले. कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ऑपरेशन सिंदूर परफॉर्मन्स. या परफॉर्मन्सने जमलेल्या सर्व पालकांचे लक्ष वेधून घेतले .तसेच ‘चक दे इंडिया’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी थेरपीसाठी उपयुक्त असा एरोबिक्सचे प्रात्यक्षिक दिले. ज्यातून आरोग्य आणि फिटनेसचा संदेश देण्यात आला .सर्वांच्या चेहऱ्यावर देश प्रेमाची चमक आनंद झळकत होता . शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले. या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, एकता, सेवाभावाची नवी ऊर्जा संचारली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडे प्रीतीका व किरदात अनुष्का यांनी केले. आभार प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूल कॅप्टन आर्या खर्डे हिने केले. तसेच यापुढील कार्यक्रमांचे प्रमुख उपस्थिती माजी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी जाहीर केले.