पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा) :- पारनेर न्यायालयाची भव्य इमारत जवळपास ३० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असल्याने ही इमारत पारनेर तालुक्यातील विकासामध्ये ऐतिहासिक ठरणार असून ते आधुनिक न्यायालय होणार असल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी सांगितले.
पारनेर-सुपा मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पारनेर न्यायालयाच्या भव्य इमारतीची पाहणी आ. काशिनाथ दाते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारल्या जाणाऱ्या या इमारतीत ४ न्यायालय सभागृह, न्यायाधीश निवासस्थान, कार्यालये आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे.
आ. दाते म्हणाले की, पारनेर तालुक्यातील वकिलांसाठी न्यायालय परिसरात स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. या जागेची मोजणीही पूर्ण झाली असून लवकरच वकिलांसाठी सुसज्ज इमारत उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. ई. वसईकर, अभियंता पंकज लेंडे, राहुल सुरवसे, सुमती गाजरे, उद्योजक मंगेश दाते, किरण कुबडे, सुनील गाडगे, संविधान जागृती अभियानचे अध्यक्ष सचिन नगरे, दादा शेटे, नियाज राजे, सतिश म्हस्के, प्रविण साळवे, संतोष भोर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
न्यायालयीन इमारत कामाचा दर्जा समाधानकारक असल्याचे सांगून हे काम तालुक्याच्या प्रतिष्ठेला साजेसे ठरेल, ही इमारत पारनेर शहराच्या वैभवात भर टाकणारी असणार आहे. अपूर्ण कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
– काशिनाथ दाते, आमदार