गंगापुर(जनता आवाज वृत्तसेवा):- गंगापूर तालुक्यात हादरून सोडणाऱ्या मुद्देश वाडगाव येथे दोन सख्ख्या चुलत भावाच्या आढळलेल्या मृतदेहामुळे गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र, गंगापूर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
सिद्धार्थ किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. बराच वेळ उलटूनही तो परतला नाही. त्यानंतर शोध घेतला असता भारत दारुंटे यांच्या मक्याच्या शेताजवळ त्याची सायकल, रिकामी पिशवी आणि शंभर रुपयांची नोट पडलेली आढळली. त्याचबरोबर रक्ताचे डागही सापडले, जे थेट जवळच्या विहिरीकडे जात असल्याचे दिसून आले.
मात्र, बिबट्याच्या हल्लात सिद्धार्थ मृत्यू पावल्याची अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, सिद्धार्थच्या आईला (सुरेखा चव्हाण) संशय आल्याने सिद्धार्थचा खून झाला असल्याची तक्रार अज्ञात आरोपीविरुद्ध गंगापूर पोलिसात दाखल केली होती. त्या दिशेने गंगापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चालू केला असता सिद्धार्थचा खून झाले असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.
त्यादृष्टीने गंगापूर पोलिसांनी अनेक संशियतांचे जवाब नोंदवले, त्यात सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण (वय 23) याचाही जबाब घेतला होता. त्यामुळे त्याने खून केला असल्याने आपले काही खरं नाही, पोलीस आपल्याला आता पकडतील या भीतीने स्वप्नीलने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली. मात्र, घरगुती किरकोळ वादावरून मनात राग धरून सख्ख्या चुलत भावाचा खून करून स्वतःही आत्महत्या केल्याने एकाच कुटुंबातील दोन भाऊ गेल्याने परिसरात मात्र हळहळ व्यक्त होत आहे.